शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही , माञ सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का?हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई : करोनामुळे दहीहंडीवर राज्य सरकारकडून याही वर्षी निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र असे असले तरीही मनसेने हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे.याच पार्श्वभूमीवर आज मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलनाला बसले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही. असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा प्रश्न जाधव यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे. पोलीस त्यांचं काम करत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात आपण ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत. या मैदानात एका वेळी पाच हजार लोक जमतात. इथे जर तुम्ही ५० लोकांनाही जमा होण्यास बंदी घालत असाल तर हे चुकीचं आहे, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करत दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात आयोजक विरुद्ध पोलीस असा संघर्ष वाजण्याची चिन्हे आहेत.

ठाणे हे दहीहंडी उत्सवाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांखेरीज राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच येथे बक्षिसांची लयलूटही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे ठाणे जिल्हाच नव्हे तर मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथके गोपाळकाल्याच्या दिवशी ठाण्यात फिरताना दिसतात. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. यंदाही करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post