मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने एक महिला वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात असून या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर - पावसाच्या मोठ्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसापासून राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला याच पावसामुळे मोठा फटका सुद्धा बसला आहे.असे असताना आज कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड या डोंगराळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तलाव फुटल्याची घटना घडली आहे.

येथील मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्याने एक महिला वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात असून या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. तसेच जनावरे, वाहनेही वाहून गेली आहे.

बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेघोली तलाव फुटल्याने शेतात, शेतातील घरे, गोठ्यात पाणी घुसले. प्रकल्प फुटल्याची माहिती कळताच रात्रीत झोपत असलेले नागरिक उठून ओढ्याच्या दिशेने धावले. अनेकांनी बचावकार्यासही सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने जनावरे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून ग्रामस्थ धावले.

दरम्यान, जनावरांची सुटका करत असताना नवले येथील एक कुटुंब वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये धनाजी मोहिते त्यांची पत्नी, जिजाबाई, मुलगा, नातू गोठ्यात गेले. धनाजी मोहिते, त्यांचा मुलगा आणि नातू झाडाला धरून बसल्याने ते वाचले. पण त्यांच्या पत्नी जिजाबाई वाहून गेल्याचे कळते.

नवले येथील निवृत्ती शिवा मोहिते यांच्या घरात ओढ्याचा प्रवाह घुसल्याने मोठे नुकसान झाले असून त्यांच्या गोठ्यातील चार जनावरे मृत्यूमुखी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबरोबर गावातील अनेक दुचाकी वाहनंही ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post