किरीट सोमय्या यांनी आपला दौरा संयमाने करावा.हसन मुश्रीफदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापूर - किरीट सोमय्या हे मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य करु नये.त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. जिल्ह्यात आमच्या राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपची परिस्थितीही त्यांनी पाहावी, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगाविला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडविण्यात आले होते. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे.

मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्यावेळी प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कुणीही अडथळा निर्माण करु नका, त्यांना येऊ द्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही कृती करु नका. त्या दिवशी ऐकू वाटले नाही तर टीव्ही बंद करा, शेतात जा. ते कुठे जातील, काय बोलतील ते त्यांना बोलू द्या, असे आवाहन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

मुश्रीफ म्हणाले, शाहू कारखाना आणि हमीदवाडा कारखान्यात आपले योगदान असताना काही कारणामुळे आपल्याला बाजूला व्हावे लागले. मात्र शेतकरी, कामगार, मजूरांना आपल्या हक्काचा कारखाना असावा अशी भावना होती. तेव्हाच आम्हाला सहकारी कारखाना काढावा लागला. त्यांचा आरोप आहे की या कारखान्यासाठी मुश्रिफांनी सत्तेतून पैसा मिळवला असावा. पण एका केंद्रीय संस्थेकडून तपास झाला आहे. गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही. उत्कृष्ट पद्धतीने हा कराखाना चालला आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post