ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला शब्द खरा करत सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

काेल्हापूर : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठोपाठ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला शब्द खरा करत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात सुमारे १०० कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबची कोर्टाने काढलेले नोटीस मात्र सोमय्यांनी स्वीकारली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले

माजी खासदार सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुश्रीफ यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत सोमय्यांचे आरोप चुकीचे असून त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज कोल्हापूरच्या न्यायालयात मुश्रीफांनी शंभर कोटींचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, आम्हीच पुरविलेले कागदपत्रे घेऊन आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असे देखील दाव्यात नमूद करण्यात आले आहे. हा सर्व खटाटाेप आम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टीने सुरू आहे. आमचे चारित्र्यहनन थांबवावे, असेही मुश्रीफांनी दाव्यात म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपांच्या माध्यमातून माझा आवाज दाबवण्याचा प्रयत्न होतो आहे. पण, तो कदापि यशस्वी होणार नाही. किरीट सोमय्या हे चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करत आहेत. सोमय्या यांनी आता चौथा, पाचवा घोटाळा बाहेर काढावा. पण, मी त्यावर आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो आहे, यात दुसरं काही नाही. सक्तवसुली संचनालयाकडे (ईडी) जाण्याचा प्रश्न नाही.

मी आमच्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे. माजी खासदार सोमय्या यांनी कोल्हापुरात यावे-जावे, काय माहिती घ्यायची ती घ्यावी. पण ते जरा अति करतात, असे मला वाटतंय. सोमय्या यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, त्यांना कोर्टाने नोटीसही काढली आहे. पण, त्यांनी ती घेतलेली नाही. दरम्यान, किरीट साेमय्या हे सध्या काेल्हापुरात असून त्यांनी मुरगुड पाेलिस ठाण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विराेधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post