भाजप उमेदवाराच्या फलकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोपेक्षा भाजप नेत्यांचे फोटो मोठे असल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली ,भाजपने तात्काळ या नाराजीची दखल घेत थेट हे फलकच बदलून टाकले.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

वाडा: वाडा तालुक्यात जिल्हापरिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, पालसई जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं.भाजप उमेदवाराच्या फलकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोपेक्षा भाजप नेत्यांचे फोटो मोठे असल्याने मनसेने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजपने तात्काळ या नाराजीची दखल घेत थेट हे फलकच बदलून टाकले.

पालसई जिल्हा परिषद गटातून धनश्री चौधरी या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. त्या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी महिला ब बालकल्याण सभापती होत्या. त्यांच्या फलकावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या छबीचा आकार भाजप नेत्याच्या छबीपेक्षा लहान ठेवण्यात आला होता. त्यामुळे आज दिवसभर भाजप व मनसे कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांची नाराजी वाढू नये म्हणून भाजपने ताडीने फलक बदलून राज ठाकरे यांची छबी मोठी असलेले फलक लावले. त्यामुळे भाजप मनसे कार्यकर्त्यांमध्ये मान अपमानाचा वाद शमल्याचे बोले जात आहे. मात्र कोणत्याही राजकीय नेतृत्वाचा अपमान भाजपने करून नये, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.

भाजप-मनसेची एकमेकांसाठी उमेदवारी मागे

पालघर जिल्ह्यात भाजपा मनसेला मदत करणार आहे. तर ज्या ठिकाणी मनसे उमेदवार आहेत त्या ठिकाणी भाजपा मनसेला मदत करणार आहे. वाडा तालुक्यातील पंचायत समिती सापणे गणातून मनसे महिला उमेदवार कार्तिक कांतिकुमार ठाकरे या निवडणूक लढवीत असून या ठिकाणी भाजपाने उमेदवारी मागे घेऊन मनसेला पाठिंबा दिला आहे. वाडा तालुक्यातील मोज, गारगाव, पालसई, अबीटघर, मांडा या पाच जिल्हा परिषद गटातून मनसेने आपली उमेदवारी मागे घेऊन भाजपाला मदत केली आहे.

पालघर जिल्हा परिषदेवर नजर

पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आलेले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अपक्ष मिळून बहुमताचा आकडा पार करत महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने जिल्हा परिषदेतील 15 सदस्य, तर पालघर, डहाणू, वाडा आणि वसई या चार पंचायत समिती मधील 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं होतं.

15 जणांचे सदस्यत्व रद्द

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 सदस्यांपैकी 8, शिवसेनेच्या 18 सदस्यांपैकी 3, भाजपच्या 12 सदस्यांपैकी 3 तर माकपच्या 5 सदस्यांपैकी 1, अशा एकूण 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. 57 सदस्यांपैकी 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने उर्वरित 42 सदस्यसंख्येमुळे बहुमताचा झालेला 22 हा आकडा गाठण्यात महाविकास आघाडीला कुठलीही अडचण निर्माण झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे ह्यांची निवड झालेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post