किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरील टीवटीव चांगलीच भोवणार ,सोमय्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यतादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांना सोशल मीडियावरील टीवटीव चांगलीच भोवणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर ट्विटर तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोटाळ्याचे बेछूट आरोप केल्याप्रकरणी सोमय्यां विरोधात अनिल परब यांनी 100 कोटींचा अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे मुंबई उच्च न्यायालयात या मानहानी दाव्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून सोमय्या मात्र गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेच्या काही मंत्र्यांवर टीका करत घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करत सोमय्यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आळ घेत त्यांची बदनामी केली आहे. अनिल देशमुख प्रकरणात परब यांचा सहभाग आहे तसेच परब यांचे दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट असून परिवहन विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर सोमय्या यांनी रत्नागिरी जिह्यातील बांधकामांशी परब यांचा संबंध असल्याचा दावा करत यासंदर्भात ट्विटही केले आहे. सोमय्या यांच्या बदनामीकारक आणि अर्थहीन ट्विटमुळे आपली नाचक्की व मानहानी झाली असल्याने सर्व ट्विट डिलीट करण्यात यावे तसेच बिनशर्त माफी मागावी यासाठी परब यांनी सोमय्या यांना 14 सप्टेंबर रोजी नोटीस पाठवली होती. 72 तासांचा अल्टीमेटमही नोटिसीतून देण्यात आला होता. मात्र, सोमय्या यांनी माफी न मागितल्यामुळे आज अनिल परब यांनी ऍड. सुषमा सिंग यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात सोमय्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

बिनशर्त माफी मागा

रत्नागिरीतील बांधकामांशी आपला कोणताही संबंध नाही. तसेच या कथित आरोपांप्रकरणी आपल्याला संबंधित प्राधिकरणाकडून नोटीसही बजावण्यात आलेली नाही. सोमय्यांनी आपल्यावर खंडणी वसुलीचेही आरोप केले व अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र हे सर्व आरोप खोटे व तथ्यहीन असल्याने त्याविरोधातच आपण अब्रुनुकसानीचा दावा केल्याचे परब यांनी याचिकेत म्हटले आहे. सोमय्या यांनी प्रतिज्ञापत्रासह त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवर, दोन प्रमुख इंग्रजी व प्रादेशिक भाषेच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीररित्या बिनशर्त माफी मागावी तसेच भविष्यात आपल्याविरोधात कोणतेही बदनामीकारक व्यक्तव्य करू नये. तसे आदेश न्यायालयाने त्यांना द्यावेत, अशी मागणी अनिल परब यांनी याचिकेतून केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post