.गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध , केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गणेशाचे दर्शन घेता येणार आहे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई सारख्या शहरात रुग्णसंख्येत काही प्रमाणात झालेली वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. याआधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात भाविकांना सुरक्षित अंतर राखून दर्शन घेण्यास दिलेली परवानगी सरकारने रद्द केली आहे.गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून केवळ ऑनलाइन पद्धतीनेच गणेशाचे दर्शन घेता येणार आहे.

संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सवात निर्बंध लादले जाणार असल्याचे अंदाज बांधले जात होते. मात्र राज्य सरकारच्या गृह विभागाने नियमावलीत विशेष बदल न करता मागील वर्षाप्रमाणे यंदाही मुखदर्शन तसेच मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध केले आहेत. त्याचप्रमाणे याआधी काढण्यात आलेली नियमावली कायम राहणार असून गणेशोत्सव मंडळांना आरती, पूजा, भजन, कीर्तन हे कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

मुळात गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करताना गृह विभागाने सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न केल्यानेच गृह विभागावर नव्याने नियमावली जाहीर करण्याची वेळ आली आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नव्या नियमावलीसंदर्भात मंडळातर्फे बैठक आम्ही बोलावली आहे.

- सुधीर साळवी, मानद सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसारच गणेशभक्तांनी ऑनलाइन दर्शन घेण्याचे आवाहन मंडळातर्फे भक्तांना केले आहे. कोरोनाच्या संकटात कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. मात्र त्यानंतरही जर दर्शनासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली तर त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
- उमेश नाईक, अध्यक्ष, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक होते. आधी दिलेल्या परवानगीने मंडळांना थोडा धीर मिळाला होता. मात्र आता पुन्हा प्रतिबंध लागू केल्याने मंडळांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. मंडळांना मिळालेल्या जाहिरातींवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच आर्थिकदृष्टय़ा मंडळे ढासळली असताना सरकारने असा निर्णय घेतल्याने मंडळांचे नुकसान झाले आहे.
- ऍड. नरेश दहीबावकर, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

गणेश प्राणप्रतिष्ठा पहाटे 4.50 ते दुपारी 1.50 पर्यंत

लाडक्या गणरायाचे उद्या (शुक्रवारी) घरोघरी उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात आगमन होत आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पहाटे 4.50पासून ते दुपारी 1ः50 वाजेपर्यंत घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा करता येईल, अशी माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली. या वर्षी कोरोना संकटामुळे अनेक बदल आपण अंगिकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा बदल करावा लागेल. श्री गणेशाचे पूजन करून त्या विघ्नहर्त्याकडे कोरोनाचे संकट जावे अशी प्रार्थना करूया, असे आवाहन दाते यांनी केले आहे.

काय आहे नियमावली

गणेशोत्सव मंडळांना केवळ ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारेच दर्शन उपलब्ध करून देता येणार.
वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.
मुंबई पालिका, स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

Post a Comment

Previous Post Next Post