भाजपच्या या लाचखोरीवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील गप्प का..? राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पिंपरी - गल्ली ते दिल्ली सर्वच ठिकाणी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या राजकीय पोळ्या भाजणारा पक्ष, अशी ओळख भारतीय जनता पक्षाची झालेली आहे. खोटे आरोप करून इतरांना बदनाम करण्यात धन्यता मानणाऱ्या नेत्यांना पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर आपली नैतिकता आठवली नाही.भाजपच्या या लाचखोरीवर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील गप्प का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उपस्थित केला आहे.

संजोग वाघेरे यांनी भाजपाच्या लाचखोरीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे टिकेची झोड उठविली आहे. या प्रसिद्धीपत्रात वाघेरे यांनी म्हटले आहे की, मागील साडेचार वर्षांत भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेत चुकीचा कारभार चालवला आहे. भाजपने शहराची दुर्दशा करून ठेवली आहे. महापालिकेच्या अनेक कामात रिंग, भ्रष्टाचार चाललेला आहे. शहरातील नागरिकांच्या हिताचा विचार कुठेही दिसत नाही. तर भाजपच्या पारदर्शक कारभाराचा खरा बुरखा स्थायी समितीवर झालेल्या कारवाईनंतर फाटला. स्थायी समितीच्या अध्यक्षांना अटक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. परंतु नैतिकतेचा विसर पडलेल्या सत्ताधारी भाजपने त्यांचा राजीनामा घेतला नाही. लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक होऊन जामिनावर सुटलेल्या स्थायी समिती अध्यक्षांकडून कारभार सुरू ठेवला आहे.

यावरून भाजपचे भ्रष्टाचारी कारभाराला असलेले समर्थन उघडपणे स्पष्ट होते. परंतु पिंपरी-चिंचवडच्या या भ्रष्टाचारावर भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील गप्प का आहेत? त्यांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना या लाच प्रकरणावरून उत्तर देणे गरजेचे आहे. लाच प्रकरणातील स्थायी समिती अध्यक्षांचा राजीनामा कधी घेणार, हे स्पष्ट केले पाहिजे.

अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांच्या राजवटीत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभार बघता भाजपच्या नेत्यांना पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही, अशी टीका संजोग वाघेरे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post