मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. .दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी  आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मुंबईत साधेपणाने झालेल्या या स्वागताने पुन्हा एकदा मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले.मुंबईतील बहुतांश मंडळांनी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत बाप्पांचे स्वागत केल्याचे चित्र लालबाग, परळ आणि आसपासच्या परिसरात दिसून आले. सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरगुती गणेशभक्तांनीदेखील रविवारचा योग साधत बाप्पांचे स्वागत केल्याची माहिती मुंबईतील अनेक मूर्तीकारांनी दिली.

मुंबईत दरवर्षी मोठय़ा उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने मोठय़ा उत्साहात बाप्पांच्या आगमन मिरवणुका काढून सार्वजनिक गणेश मंडळांकडून स्वागत केले जाते. कोरोनामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याची वेळ गणेशभक्तांवर आल्याने यंदा बाप्पांचे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याची वेळ गणेश मंडळांवर आली आहे. त्यानुसार मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारचा मुहूर्त साधत बाप्पांचे स्वागत केल्याचे चित्र दिसून आले.

मुख्य म्हणजे मुंबईतील लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि काळाचौकी येथील अनेक मूर्तीकारांना देशभरातून मागणी असते. त्यामुळे नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि उपनगरातून अनेक मंडळांनी आजच गणरायाची मूर्ती मंडपात नेण्यासाठी सकाळपासून धावपळ केल्याचे चित्र दिसून आले. अत्यंत साधेपणाने, शांततेत, मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पांचे आगमन सोहळे आयोजित करण्यात आले होते.

पारंपरिक पद्धतीने स्वागत

गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आगमन सोहळ्यांच्या निमित्ताने एकच स्पर्धा रंगते. आगमन सोहळ्याच्या निमित्ताने ढोल-ताशा पथक, पुणेरी ढोल असो किंवा डीजेच्या तालावर थिरकणारी गणेशभक्तांची गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यंदा मात्र कोरोनाच्या नियमांमुळे अनेक गणेश मंडळांनी बाप्पांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने आणि साधेपणाने केले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात आणि टाळ-मृदुगांच्या सान्निध्यात रंगलेला हा सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची गर्दी

आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागताच्या तयारीसाठी मुंबईतील बाजारपेठांत आज सकाळपासून गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. अंधेरी, दादर, लालबाग, परळ आणि क्रॉफर्ड मार्पेट येथे सकाळपासून गणेशभक्तांनी गर्दी केली होती. बाप्पाच्या आगमनासाठी आर्पषक देखावे असो किंवा पूजा साहित्य सामानाच्या खरेदीसाठी मुंबईकरांची धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.

उंची वाढविण्यासाठी नव्या आयडिया

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आर्पषक आणि उंच गणेशमूर्ती या नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. यंदा मात्र शासनाच्या नियमावलीमुळे सार्वजनिक मंडळांना मूर्तीसाठी 4 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही काही मंडळांनी आपल्या गणेशमूर्तीची उंची वाढविण्यासाठी नवी आयडियाची कल्पना लढविली आहे. अनेक मंडळांनी बाप्पांसाठी तयार केलेले सिंहासन किंवा विविध वाहनांवर गणेशमूर्ती उभ्या केल्या असून त्यांची उंची 4 फुटांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post