दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुणे : वर्ध्यातील भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी आपल्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ आपल्यापर्यंत आला असून पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान व्हिडीओत महिला आपल्या जीवाला धोका असून मला येथून घेऊन चला अशी विनंती रुपाली चाकणकर यांना करत आहे.वर्धा भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत,' अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमधून दिली आहे.
१२ सेकंदाच्या या व्हिडीओत दिसणारी महिला सांगत आहे की, 'मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे येथे, मॅडम प्लीज मला येथून घेऊन चला. मी विनंती करते'.
रुपाली चाकणकर यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'रामदास तडस यांचे कुटुंबीय, मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून महिलेला मारहाण करत असून प्रचंड मानसिक त्रास दिला जात आहे. महिलेची अवस्था फार वाईट असून खूप घाबरलेली आहे. ती बोलूही शकत नाही. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे कडक कारवाई करावी'.