दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुणे शहरातील ससून हॉस्पिटलमधून 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलीस आणि नागरिकांना सतर्कता दाखवत रिक्षाचा पाठलाग केला आणि आरोपी महिलेला पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला दोन मुलींसह ससूनमध्ये उपचाराला आल्या होत्या. सोनिग्राफी करण्यासाठी मोठ्या मुलीला वार्डमध्ये घेऊन जायचे होते. त्यामुळे महिलेने रुग्णालयातील ओळखीच्या महिलेकडे 3 महिन्यांची मुलगी सांभाळ करण्यासाठी दिली होती. डॉक्टरांनी बोलविले असल्यामुळे महिला मोठ्या मुलला घेऊन सोनोग्राफी वार्डमध्ये गेली.याच दरम्यान, नर्सच्या वेशात आलेल्या एका बाईने मुलीला माझ्याकडे द्या, तिची आई आल्यानंतर मी बाळाला त्यांच्याकडे देते असे सांगून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर नर्सच्या वेशात असलेल्या महिलेने बाळाचे अपहरण करून रिक्षातून पळ काढला.
मोठ्या मुलीच्या उपचारानंतर बाहेर आलेल्या महिलेला मुलगी दिसून आली नाही. त्यानंतर तिने सुरक्षा रक्षकांना विचारले असता, एक महिला बाळाला घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बंडगार्डन पोलीस आणि नागरिकांनी रिक्षा चालकाला संपर्क करून चंदन नगर परिसरात महिलेला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळवून नेल्याच्या घटनेने ससूनची सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे.