दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे.अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरा मध्येच विसर्जन होणार आहे.
गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच व आॅनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुस-या वर्षी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रीं च्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केल. दगडूशेठच्या श्रीं चे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे.
रविवारी सायंकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळ्याच्या कुंडामध्ये श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना श्रीं ची चरणी यावेळी करण्यात येणार आहे.
अशोक गोडसे म्हणाले, समस्त पुणेकरांनी व गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.