दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ही पदेही लिलाव करूनच वाटण्यात आली आहेत.पुणे लुटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील निविदा आणि चंद्रकांत पाटील यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत बहुउद्देशीय कामगार पुरविण्याच्या 41 कोटींच्या निविदेला मान्यता मिळाली आहे. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थायी समितीचे सदस्य नंदा लोणकर आणि बंडू गायकवाड उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघामधून निवडून आल्यानंतर महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीला काळ्या यादीत टाकले असतानासुध्दा महापालिकेने 41 कोटींची निविदा या कंपनीला दिली आहे. भाजपकडून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्तांची तक्रार करणार
महापालिकेतील दोन्ही अतिरीक्त आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असून, त्यांनी कायद्याप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. सनदी अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पध्दतीने काम करण्यात येत आहे. शहराच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव आयत्यावेळी स्थायी समितीसमोर आणले जातात. नियमांची पायमल्ली करण्यात येत असल्यामुळे याची तक्रार पालकमंञी अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.