भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे समोर आल्याने आमदार कांबळे यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुणे केन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.शिवीगाळ करतानाची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत भाजपच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. त्यातच आता भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे समोर आल्याने आमदार कांबळे  यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या ड्रेनेज विभागातील वरिष्ठ पदावर संबंधित महिला अधिकारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडील कामासंदर्भात आमदार कांबळे यांनी एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी या कामासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांची परवानगीची आवश्यकता आहे असे संबंधित महिला अधिकाऱ्याने सांगितले. त्यावरून चिडून कांबळे यांनी या महिला अधिकाऱ्याला अगदी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे महिला अधिकाऱ्याने तो फोन कार्यकर्त्याच्या हातात दिला. मात्र कांबळे यांनी कार्यकर्त्याला फोन स्पिकरवर ठेवायला सांगुन पुन्हा एकदा शिवीगाळ केली. एवढेच नाही तर काही पुरुष अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांनाही शिवीगाळ केली. या संभाषणाचे मोबाईल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान हे रेकॉर्डिंग काही महिन्यांपूर्वीच असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसापासून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना विशेष अधिवेशन घ्यायला सांगितले आहे.तर भाजपच्या महिला आमदारांनी सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्याना पत्र लिहून लक्ष वेधले आहे.त्यातच भाजप आमदाराने असे कृत्य केल्याने भाजप अडचणीत सापडला असून त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post