दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी केली होती.तसेच 'मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार' असे चॅलेंज देणाऱ्या या पेजचा चालक अभिजीत लिमये याच्या पुणे सायबर क्राईमने मुसक्या आवळल्या. सांगली येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आली.
लिमये याला आज पुणे येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यावेळी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी या अभिजित लिमयेच्या तोंडाला काळे फासत त्याच्याकडून पुन्हा असे करणार नाही, असं वदवून घेतले. सोशल मीडियावर व्यक्त होताना प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मोठ्या कष्टाने ज्या नेत्यांनी आपली कारकीर्द घडवली त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अशाच प्रकारे समाचार घेणार, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.