सांगली शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 सांगली शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने अनेक सखल भागांत पाणीच पाणी झाले. सांगली शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई परिसरात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली.महापुरानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच हवेत गारठा जाणवत होता. दुपारनंतर हलक्या सरींनी पावसाची सुरुवात झाली. मात्र, दुपारनंतर सरीवर सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे सांगली शहरात अनेक सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. पावसाच्या संततधारेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. शहराप्रमाणेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आज पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी संततधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आज झालेला पाऊस पिकांना वरदान ठरणार असल्याची भावना शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर परिसरात संततधार पाऊस

महाबळेश्वर - दोन दिवसांपासून येथे पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. आजदेखील येथे पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून येथे मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी आहे. दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे आज पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post