औद्योगिक क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कामगारांना दिवाळी बोनस देणारदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 कोल्हापूर : कोरोना मुळे उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठेतील मालाचा उठाव थंडावला होता. यात औद्योगिक अर्थकारणावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीतही औद्योगिक क्षेत्रातील ७० टक्के कंपन्या कामगारांना दिवाळी बोनस देणार आहेत.जिल्ह्यातील चार औद्योगिक वसाहतींत दोन हजारांवर लहानमोठ्या कंपन्या आहेत.जवळपास ८० हजारांवर कामगार आहेत. यांतील जवळपास २० हजारांवर कामगार परप्रांतीय, तर उर्वरित स्थानिक आहेत. दरवर्षी दिवाळीला बोनस देण्यात येतो. काही ठिकाणी एक वेतन, तर काही ठिकाणी निम्मे वेतन देण्यात येते. शासनाच्या आदेशानुसार किमान ८.३३ टक्के बोनस द्यावा लागतो.

गेल्या पावणेदोन वर्षात कोरोनामुळे दीर्घकाळ लॉकडाउन होता. परदेशातून येणाऱ्या कच्च्या मालाची आयात थांबली तशी उत्पादित मालाची निर्यातही मंदावली. यात अपवाद वगळून बहुतेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी खाली आली. अशा स्थितीत बहुतांशी कंपन्या कामगार कपात करण्याचा किंवा खर्चाची बचत करण्याचा मार्ग अवलंबत आहेत.

कोरोना काळात निम्म्याहून अधिक कंपन्यांत कामगारांना पन्नास टक्के वेतन देण्यात येत होते; पण आपल्याला किमान कामावर ठेवले आहे, याबाबत कामगारही समाधानी असल्याचे सांगत आहेत. राज्यातील कोरोनाचे संकट कमी झाल्याने परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. त्यामुळे वेतन व बोनस असे दोन्ही लाभ द्यावेत, असा आग्रह धरणाऱ्या कामगारांची संख्याही मोठी आहे.

घरातील मोठ्या व्यक्ती काटकसर करू शकतात; पण लहान मुलांसाठी दिवाळी सणाचा आनंद असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे किमान यावर्षी चांगल्या प्रमाणात बोनस मिळावा.

-शंकर खोत, उपाध्यक्ष, औद्योगिक कामगार संघटना.

कोरोनामुळे परदेशातून कच्चा माल येत नाही. त्यामुळे औद्योगिक अर्थकारणाची गती मंदावलेली आहे. तरीही गेल्या वर्षी बहुतांशी कंपन्यांनी कामगारांना बोनस दिला. यंदाही बोनस दिला जाणार आहे.

-श्रीकांत पोतनीस,

माजी अध्यक्ष, गोशिमा.

Post a Comment

Previous Post Next Post