आर.सी. गँगच्या १० जणांवर जिल्हा पोलिस दलाने मोकाअंतर्गत कारवाई

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : खून, दरोडा , मारामाऱ्या असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या आर.सी. गँगच्या १० जणांवर जिल्हा पोलिस दलाने मोकाअंतर्गत कारवाई केली.रवी सुरेश शिंदे, प्रदीप रामचंद्र कदम, संदीप मोतीराम गायकवाड, जावेद इब्राहीम सैय्यद, सागर सुरेश जाधव, प्रकाश कुबेर कांबळे, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय सुनील माने, योगेश मानसिंग पाटील आणि विकी माटुंगे अशी त्याची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर. सी. गँगवर वर्चस्व प्रस्तापित करण्यास खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, बदला घेणे, गंभीर दुखापत, प्राणघातक शस्त्र तस्करी, गर्दी जमवून मारामारी असे गंभीर स्वरूपाचे दखलपात्र ३७ तर ८ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, २२ सप्टेंबर सायंकाळी भास्कर डॉन गँगचा प्रमुख अमोल भास्कर याच्या मोटारीचा पाठलाग करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आर.सी. गँगच्या संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या संघटित गुन्हेगारीची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आर. सी. गँगवर मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. अधीक्षक बलकवडे यांच्यामार्फत तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी त्याला मंजुरी दिली. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक रामेश्वर बेंजने तपास करीत आहेत.

मोकांतर्गत वर्षात तिसरी कारवाई...

संघटित गुन्हेगारांवर जिल्हा पोलिस दलाने तीन टोळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करून ३७ संशयित समाजकंटकांवर गुन्‍हे दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

"गुन्हेगारांवर यापुढे मोकासह एनपीडीए, हद्दपारीसारखी कडक कारवाईची मोहीम अशीच सुरू ठेवण्यात येईल."

- दत्तात्रय नाळे, निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे

Post a Comment

Previous Post Next Post