कोल्हापूर : बावडेकर आयुर्वेदिक औषधांची दोन्ही दुकाने वन विभागाने सील केलीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : महापालिकेसमोर असलेल्या बावडेकर आयुर्वेदिक औषधांची दोन्ही दुकाने सोमवारी सायंकाळी वन विभागाने सील केली. निर्बंध असलेल्या औषधी वनस्पती, प्राण्यांच्या अवशेषांचा साठा केल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आलीवन विभागाच्या पथकाकडून सुमारे सात तास ही कारवाई सुरू होती. दुकानांसह गोदामही सील करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

निर्बंध असलेल्या वनस्पती, प्राणी यांच्यातील घटकांचा वापर केल्याबाबत सांगली जिल्ह्यात वन विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुरू असलेल्या तपासात कोल्हापूर शहरातील बावडेकर या नावाने प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही दुकानांची नावे समोर आल्याने छापा टाकला.

दुपारी साडेतीनच्या सुमारास सहायक वनसरंक्षक सुनील निकम, करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, सांगलीच्या मोबाईल स्क्वॉड पथकाचे वनक्षेत्रपाल एस. व्ही. खोत यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या 12 कर्मचार्‍यांच्या पथकाने या दोन्ही दुकानांवर एकाच वेळी कारवाई सुरू केली. दुकानांत विक्रीसाठी असलेली सर्व औषधे आणि साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर ही दुकाने व गोदामेही सील करण्यात आली.

कारवाई दरम्यान सांबराचे शिंग, घोरपडीपासून केलेले जोड, इंद्रजाल वनस्पती आदी आढळून आले आहे. तसेच जप्त केलेल्या औषधांची रासायनिक तपासणी केली जाणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कारवाई दरम्यान आढळलेले घटक कोठून आणले, त्याबाबतची परवानगीची कागदपत्रे आहेत की नाही, अशी निर्बंध असलेल्या घटकांची तस्करी सुरू आहे का आदींचाही तपास केला जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post