तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही....राजू शेट्टी .दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल तर द्या, उगीच त्यांची थट्टा कशाला करताय?, असा सवाल करत जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.महापुराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर जिल्ह्यात पूर परिस्थितीचा पाहण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. मंगळवारी केंद्रीय पथक कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. पथकाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत त्यावेळी झालेलं नुकसान आता पथकाला कसं दिसणार, किंबहुना त्यांना शेतकऱ्यांच्या भावना कशा कळणार, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

दोन महिन्यांनंतरही मदत नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय?

“दोन महिन्यांपूर्वी पूर येऊन गेलाय. आता केंद्रीय पथक पुराच्या पाहणीसाठी येत आहे. राजू शेट्टी यांनी हसुर इथल्या महेश पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. आता पथक पाहणीसाठी येतंय. पण पाहणी केल्यानंतर इथे काहीच नुकसान झालं नाही, असा निष्कर्ष केंद्रीय पथक काढणार, मात्र वास्तविक पाहता 2 लाखांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे. तसंच पेरणीसाठी पुन्हा 30 ते 35 हजार खर्च झाले. हा हिशेब कुणाला सांगायचा, द्यायची असेल तर मदत द्या, चेष्टा कशाला करताय, जर मदत द्यायची नसेल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला.

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही

शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात 'जागर एफआरपी'चा हे आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. यावेळी त्यांनी एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आंदोलनाची घोषणा केली. येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन छेडण्यात येईल. आराधना शक्तिस्थळापासून हे आंदोलन सुरू करू, असं शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीवरूनही राज्य सरकारवर टीका केली. पूरग्रस्तांना अद्यापही मदत करण्यात आली नाही. आमचा दुसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला.

स्वाभिमानी संघटना झोपलीय असा गैरसमज करू नका

केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलंय. भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचं अनौरस बाळ जन्माला घातलंय. आम्ही ते खपवून घेणार नाही. आज पुण्यात भाजपच एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झालं. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल, असं सांगतानाच स्वाभिमानी कोरोना नियमांचं पालन करून आंदोलन करते. स्वाभिमानी संघटना झोपली असा गैरसमज कुणीही करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post