गांधीनगर सारखी व्यापारी पेठ आणि एमआयडीसीचा हद्दवाढीत समावेश होणे आवश्यक
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जानेवारीत कोल्हापूर दौऱ्यावर आले आणि त्यांनी हद्दवाढीवर भाष्य केले.हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवून द्या, अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. त्यानुसार प्रशासनाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. आता शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हद्दवाढीच्या प्रश्नावर शिंदे कोणती ठोस भूमिका घेणार, या कडे शहरवासीयांचे लक्ष आहे.
अठरा गावे तसेच दोन एमआयडीसी असा २० गावांचा प्रस्ताव नगरविकास विभागाला नव्याने सादर करण्यात आला. गेल्या दहा महिन्यांपासून या प्रस्तावावर नुसतीच चर्चा सुरू आहे. तोपर्यंत बहुसदस्यीय रचनेनुसार महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी सहा महिने हद्दवाढीची घोषणा करता येत नाही.
हद्दवाढ कृती समितीने प्रसंगी निवडणूक पुढे ढकला; पण हद्दवाढ करा, अशी आग्रही मागणी केली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हद्दवाढीसाठी आग्रही आहेत. आमदार चंद्रकांत जाधव यांनी सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करू, अशी ग्वाही दिली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी आघाडीला हद्दवाढ गरजेची वाटते; मग अडचण काय आहे, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून हद्दवाढ करा, असे सांगून अनेकांचा घसा कोरडा झाला. कोल्हापूरच्या पाठीमागून नाशिक, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई अशी अनेक शहरे पुढे निघून गेली; पण एका इंचानेही हद्दवाढ झाली नाही. पुण्याची तेरा वेळा हद्दवाढ होते आणि कोल्हापूरची का नाही, असा प्रश्न अनेक वर्षे पडला आहे. मतदारसंघ हवा; पण हद्दवाढ नको, अशी मानसिकता नेमकी कोणाची आहे, हेही ठाऊक आहे. कोल्हापूरचा विकास व्हायचा असेल, तर ही मानसिकता आता परवडणारी नाही. लोकसंख्येच्या निकषात बसत नसल्याने स्मार्ट सिटीच्या निधीला कोल्हापूर आधीच मुकले आहे.
नदीच्या पलीकडील किंवा महामार्गावर असलेली गावे राहू देत; किमान ज्यांची भौगोलिक संलग्नता शहराशी जोडली गेली आहे, ती गावे तरी पहिल्या टप्प्यात हद्दवाढीत येऊ देत, इतकीच अपेक्षा शहरवासीयांची आहे. कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, आर. के. नगर, उचगाव, सरनोबतवाडी यांचा हद्दवाढीला विरोध नाही. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील २८ प्रभागांचा पूर्वीच शहरात समावेश झाला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात नवे बालिंगे, शिंगणापूर, पीरवाडी या तीनच गावांचा समावेश होतो.
गांधीनगर, वळिवडे तसेच दोन्ही एमआयडीसीतील उद्योजकांची समजूत काढणे आवश्यक आहे. हद्दवाढीत नुसती गावे घेऊन चालत नाहीत, तर रस्ते, पाणी, कचरा उठाव अशा सुविधांसाठी उत्पन्न वाढही महत्त्वाची आहे. कोल्हापूर शहर असे एकमेव शहर आहे की दोन्ही एमआयडीसी शहराच्या बाहेर आहेत. गांधीनगर सारखी व्यापारी पेठ आणि एमआयडीसीचा हद्दवाढीत समावेश होणे आवश्यक आहे.