दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कर्करोगावरील औषधांचा काळा बाजार करून आपला खिसा गरम करण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱया कल्याण येथील एका कंपनीला आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने दणका दिला.नामांकित कंपनीच्या नावाने अॅडसेटारिक इंजेक्शन आणि आईसलूसिंग या गोळ्या बनावट बनवून विकणाऱया पंपनीची सर्वेसर्वा असलेल्या पूजा राणा (30) या महिलेला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. तिच्याकडून तब्बल 67 लाख 90 हजार रुपये किमतीचा बनावट औषध साठा जप्त करण्यात आला.
टाकेडा फार्मास्युटिकल लिमिटेड ही जपानची कंपनी कर्करोगावर औषधं बनवते. टाकेडा कंपनीच्या नावाने मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील काही फार्मा पंपनी बेकायदेशीरित्या अॅडसेटारिक इंजेक्शन आणि आईसलूसिंग या बनावट गोळ्या बनवतात. तसेच त्याचा साठा करून ते कर्करोग झालेल्या रुग्णांना विकतात अशी तक्रार आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाकडे युनायटेड ओवसीज ट्रेड मार्क कंपनीच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रोहित सावंत तसेच डोईफोडे, वलेकर, यादव, दरेकर व पथकाने चौकशी केली असता प्राईम हेल्थ प्रा.लि. ही कंपनी कर्करोगावरील बनावट औषधांचा काळाबाजार करीत असल्याचे निष्पन्न झाले. पाटील व त्यांच्या पथकाने कल्याण पूर्वेकडील नेतवली नाका येथे असलेल्या प्राईम हेल्थ प्रा.लि. कंपनीवर छापा टाकला.