दैनिक हुपरी समाचार :
राज्य सरकारी-निमसरकारी अधिकारी -कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११ टक्कयांनी वाढविण्यात आला असून त्याचा लाभ १९ लाख अधिकारी- कर्मचाऱ्यांना होणार आहे.त्याचप्रमाणे सन २०१९मधील महागाई भत्याची पाच महिन्यांची थकबाकीही देण्यात येणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे.
करोनामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेले वर्षभर गोठविण्यात आला होता. मात्र आता आर्थिक स्थिती सुधारल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये १ जुलैपासून १७ टक्यावरून वरून २८ टक्यांपर्यंत ११ टक्यांची वाढ करण्यात आली आहे. ऑक्टोबरपासून हा वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १जुलै ते ३० नोव्हेंबर दरम्यानच्या पाच महिन्यातील १० टक्के वाढीव महागाई भत्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही सरकारने लवकर निर्णय घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दी. कु लथे आणि अध्यक्ष विनोद देसाई यांनी के ली आहे.