महाराष्ट्र आणि गोवामधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता पूर्ववत प्रवास करता येणार आहे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

महाराष्ट्र आणि गोवामधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता पूर्ववत प्रवास करता येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने लादलेले निर्बंध उठविण्यात येत असून, आरटीपीसीआर तपासणी नाकेही हटविण्यात येत आहेत.कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेत कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्यात इतर राज्यांतून प्रवेश करणाऱयांवर कडक निर्बंध लादून आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केला होता. विशेषतः महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील नागरिकांना प्रवेश बंद करून, आरटीपीसीर चाचणी अहवाल सक्तीचा केला होता. अगदी बसवाहतूकही बंद करण्यात आली होती. कर्नाटक सरकारच्या या आडमुठय़ा धोरणाबाबत महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे शिवसेनाही आक्रमक झाली होती.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून महाराष्ट्र आणि गोव्यातून सीमाभागातील बेळगाव जिह्यात येणाऱया प्रत्येकाला आरटीपीसीआरची गरज होती. मात्र, आता ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आरटीपीसीआरची अट शिथिल करण्याचा आदेश बजावला आहे.

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर अनेक रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले होते. काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बेळगाव जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर आता हे बॅरिकेड हटवले जाणार आहेत. रस्त्यासह रेल्वेस्थानक आणि विमानतळावरदेखील याची अंमलबजावणी होणार आहे. नवरात्रोत्सवात आरटीपीसीआरची अट शिथिल व्हावी, अशी मागणी शिवसेनेसह इतर पक्ष, संघटनांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनीही मागणी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post