दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस पुर्णपणे वैतागला आहे. त्यातच गेल्या काही दिवसात या इंधनाचे दर हे चढत्या क्रमात असल्याचं पाहायला मिळत आहे.दररोज इंधनांच्या प्रति लिटर किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असताना आज पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे.
पेट्रोल डिझेलचे वाढते दर हा चिंतेचा विषय बनला असताना आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलचा दर हा जैसे थे असणार आहे. पण सध्या डिझेलनेही शंभरी गाठली असताना इंधनाच्या दरवाढीला लगाम कधी लागणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसातच पेट्रोलच्या दरात 2.80 रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली तर डिझेलच्या दरात 3.30 रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर हा 110 रुपये प्रति लिटर असून डिझेलने इतिहासात पहिल्यांदाच शंभरी गाठत 101 रूपये प्रति लिटर एवढा विक्रमी टप्पा गाठला आहे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने एकूणच परिस्थिती आवाक्याबाहेर गेली असून महागाई देखील वाढत आहे. त्यातच आता सरकार इंधनाचे दर कमी करण्यासाठी काही ठोस पावलं उचलणार का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.