सातारा : भाजप नेते किरीट सोमय्या आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते व कारखाना शेतकरी सभासदांनी त्यांना घेराव घातला


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते व कारखाना शेतकरी सभासदांनी त्यांना घेराव घातला.यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिम्मत असेल तर कारखान्याचे मालक कोण? हे जाहीर करावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

बुधवारी सकाळी पाऊणे दहा वाजता जरंडेश्वर कारखान्यावर किरीट सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. यावेळी कारखान्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. सुरुवातीला जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. कारखाना चुकीच्या पद्धतीने लिलाव केला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी सोमय्या यांनी त्यांच्या भावना ऐकून घेऊन कारखाना मूळ सभासद यांचा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला थांबलेले पाच, सहा राष्ट्रवादी कार्यकर्ते व शेतकरी तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना घेराव घालत कारखाना सुस्थितीत सुरू आहे. आपल्या अशा पवित्र्याने कारखाना बंद पडेल. शेतकरी, कामगार देशोधडीला लागेल असे म्हणत जाब विचारला. यामुळे वातावरण तापले. सोमय्या यांनी त्यांचीही बाजू ऐकून खुलासा की, कारखाना सुरूच राहिला पाहिजे. शेतकरी व कामगार यांचे हित सुरूच राहिले पाहिजे. आपला लढा केवळ चुकीच्या पद्धतीने लिलाव झाल्या विरुद्ध आहे. कारखाना मूळ सभासदांना मिळाला पाहिजे. याबाबत उच्च न्यायालयाने लिलाव प्रक्रियेबाबत आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post