सोलापूर शहर गुन्हे शाखेने पालघरमध्ये धडक मारून बनावट डिझेल तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त , १६ कोटी १९ लाख ९० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

  पेट्रोल व डिझेलच्या किमती सतत भडकत असताना बनावट डिझेल तयार करून विकणारी टोळी सोलापुरात सापडली आहे. या टोळीचे धागेदोरे थेट पालघर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सोलापूर शहर गुन्हे शाखेने पालघरमध्ये धडक मारून बनावट डिझेल तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.यात एकूण १६ कोटी १९ लाख ९० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

सोलापुरात बनावट डिझेल विकले जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांना मिळाली होती. यानंतर तातडीने पुणे-हैदराबाद महामार्गावर जुन्या पुणे नाक्याजवळ आकांक्षा लॉजिस्टिक नावाच्या खासगी प्रवासी बसथांब्याच्या मोकळ्या मैदानावर छापा टाकण्यात आला. यावेळी तिथे एका टँकरमधून प्रवासी बसमध्ये डिझेल भरले जात असल्याचे दिसून आले. पण हे डिझेल बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

कंपनीच्या मालकासह ७ जण ताब्यात!

याप्रकरणी तानाजी कालिदास ताटे (मानेगाव, ता. बार्शी), युवराज प्रकाश प्रबळकर (रा. वैराग, ता. बार्शी), तसेच आकांक्षा लॉजिस्टिक कंपनीचे मालक अविनाश सदाशिव गंजे (रा. भवानीपेठ, सोलापूर), त्यांचे बंधू सुधाकर सदाशिव गंजे आदी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळावरून डिझेल भरलेला टँकर व तीन खासगी प्रवासी आराम बसेस जप्त करण्यात आल्या आहेत.

हे बनावट डिझेल हिमांशू संजय भूमकर (वय २१, रा. वैराग, ता. बार्शी) याच्याकडून पाठविले जात असल्याचे दिसून आल्याने त्याचाही शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली. तेव्हा हा बनावट डिझेलचा साठा पालघर जिल्ह्यातील खुपरी (ता. वाडा) येथील साई ओम पेट्रो स्पेशालिटिज लि. कंपनीतून येत असल्याची माहिती हाती लागली. त्या आधारे पोलीस उपायुक्त बापू बांगर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या पथकाने खुपरी येथे साई ओम पेट्रो कंपनीत जाऊन छापा टाकला असता या कंपनीकडे ऑईल पुनर्प्रक्रिया करण्याचा परवाना असताना प्रत्यक्षात रासायनिक द्रवपदार्थ वापरून डिझेल तयार करून राज्यभरात विकले जात असल्याचे उघडकीस आले. बनावट डिझेल तयार करणाऱ्या यंत्रसामग्रीसह यावेळी संपूर्ण कारखान्याची जप्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post