राष्ट्रवादीने हिंमत असेल तर सभागृहात यावे राष्ट्रवादीला आव्हान ..
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
इस्लामपूर : अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने आजच्या विशेष सभेलाही दांडी मारल्याने सभा रद्द करण्यात आली. विकासाच्या आडवे येताना राष्ट्रवादी काँग्रेस शहरात चुकीचा पायंडा पाडत असून हे दुर्दैवी असल्याची खंत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी व्यक्त केली.दरम्यान हीच सभा उद्या (ता. १४) दुपारी चार वाजता पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. उद्याही हीच परिस्थिती निर्माण झाल्यास हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. विकास आघाडीचे बारा सदस्य उपस्थित होते. कोरम पूर्ण होण्यासाठी पंधरा सदस्यांची उपस्थिती आवश्यक होती. त्यामुळे गणपूर्ती अभावी सभा रद्द करण्यात येत असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.
शिवसेनेचे नेते आनंदराव पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून अकरा कोटी रुपयांचे अनुदान मंजूर आहे. त्यातील कामांच्या मंजुरीसाठी तातडीने नोटीस जारी करून गुरुवारी (ता. ११) या विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ती सभा रद्द करावी लागली होती. आज पुन्हा एकदा ही सभा झाली मात्र पुन्हा राष्ट्रवादीने दांडी मारली.
याबाबत नाराजी व्यक्त करत निशिकांत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी ज्या विशेष सभेचा उल्लेख वारंवार तहकूब केलेली सभा अशी करत आहे, ती त्यांच्याच सुचनेने तहकूब करण्यात आली होती. आम्ही नेहमी विकासाला प्राधान्य दिले. निधी कोणत्याही पक्ष, नेता, सरकारचा आलेला असो तो शहराच्या विकासासाठी होता, त्यामुळे आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. परंतु राष्ट्रवादीने मात्र राजकारण केले. त्यांच्या नेत्यांनी अमुक निधी मंजूर करून आणला असे ते सांगत असले तरी जयंत पाटील यांच्याकडून एकही रुपया पालिकेला मिळालेला नाही.
विकासाला विरोध करून उलट ते नागरिकांची दिशाभूल करत आहेत.संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने राबवली जात असताना राष्ट्रवादी विनाकारण शहराचे नुकसान करत असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी केली.
विक्रम पाटील म्हणाले, "राष्ट्रवादीला शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्याविरोधात शहरातील जनता रस्त्यावर आणू." बोलवता धनी वेगळा असलेल्या नगरसेवकांसाठी वेळ न घालवता पुढचा निर्णय घ्यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावा अशी सूचना शकील सय्यद यांनी केली.वाळवा बझारच्या माडीवर बसण्यापेक्षा राष्ट्रवादीने हिंमत असेल तर सभागृहात यावे असे राष्ट्रवादीला आव्हान दिले.