कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने कर्नाटक राज्य शासनाने सीमा तपासणी पथके सज्ज केली

 कोगनोळी : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने कर्नाटक राज्य शासनाने सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत.कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. परंतु सीमा भागातील नागरिक तसेच कर्नाटक राज्याबाहेर पुढील राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे. या प्रवाशांच्या रहिवाशी पुराव्यांची खातरजमा करून कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर त्यांना प्रवेश देण्यात येतो.


गेली दोन वर्ष कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. आता काहीशी रुग्ण संख्या घटत असतानाच नव्या 'ओमायक्रॉन' या विषाणूचे संक्रमित रुग्ण देशात आढळून आले आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक शासनाने राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवाशांना आरटीपीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

केरळ, तामिळनाडू व गोवा राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना सवलत

महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमेजवळ कर्नाटकात राहणाऱ्या नागरिकांची महाराष्ट्रात वारंवार ये-जा असते. त्यामुळे अशा नागरिकांना सवलत देण्यात आली आहे. तसेच कर्नाटक व्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू व गोवा अशा राज्यांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर राज्यातील प्रवेशास सवलत देण्यात आली आहे.

तपासणी पथकाद्वारे प्रवाशांची कसून तपासणी

कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी याठिकाणी तैनात केलेल्या तपासणी पथकाद्वारे प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. कर्नाटकात जात असलेल्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल नसेल व अति महत्त्वाच्या कामासाठी कर्नाटकात जात असेल तर त्याची याठिकाणी रॅपिड एंटीजन टेस्ट केली जाते. ही टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्या प्रवाशास कर्नाटकात प्रवेश दिला जातो.

आजरा, गडहिंग्लज, चंदगडकराना सवलत

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यांना जाण्यासाठी कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करावा लागतो. आरटीपीसीआर सक्तीमुळे या तालुक्यातील प्रवाशांच्या जिल्ह्यांतर्गत प्रवासावरच निर्बंध आले होते. परंतु या प्रवाशांच्या रहिवासी पुराव्यांची खातरजमा करून त्यांच्या प्रवासास सवलत देण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार