कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : मंत्रिमंडळामध्ये सोमवारी झालेल्या निर्णयानुसार आता कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत.त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात हे मतदारसंघ वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सध्या जिल्हा परिषदेचे ६७ सदस्य असून पंचायत समितीचे १३४ सदस्य आहेत. जिल्ह्यात आजरा, चंदगड, हातकणंगले, हुपरी या नगरपंचायती आणि नगरपालिका झाल्याने त्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या आता या रचनेतून कमी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या मतदारसंघांची रचना बदलणार हे नक्की आहे.

अशातच मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत लोकसंख्येच्या सध्याच्य स्थितीवर आधारित सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०११ नंतर वाढलेली लोकसंख्या गृहीत धरून हे मतदारसंघ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत.

जिल्हा परिषद मतदारसंघ तयार करताना किमान ४० हजारांची लोकसंख्या गृहीत धरली जाते. मात्र करवीर, कागल, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यात मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. त्यामुळे हे वाढीव मतदारसंघ या तालुक्यात प्राधान्याने होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. या वाढीव मतदारसंघांची अधिकृत अधिसूचना निघाल्यानंतर याबाबत निश्चितता येणार आहे.

जुन्या आराखड्याप्रमाणे आजऱ्याला दणका

२०११ च्या लोकसंख्येनुसार महसूल विभागाकडून जे नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजरा नगरपंचायतीची स्थापना झाल्यामुळे आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द होणार आहे. तर कागल आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी एक मतदारसंघ वाढणार आहे. मात्र आता सध्याची लोकसंख्या गृहीत धरता आजऱ्याचा मतदारसंघ टिकण्याची शक्यता आहे.

पक्षीय रस्सीखेच वाढणार, समझोत्याला उपयुक्त

एकीकडे ९ जिल्हा परिषद सदस्य आणि १८ पंचायत समिती सदस्य वाढणार असल्याने याचा महाविकास आघाडीला फायदा ठरण्याची शक्यता आहे. कारण तीनही पक्षाच्या इच्छुकांमध्ये समझोता करताना कमी जागांचा प्रश्न होता. मात्र आता जागा वाढल्यामुळे एकीकडे राजकीय रस्सीखेच वाढणार असली तरी जागा वाटपामध्ये शब्द पाळण्यासाठी वाढलेल्या जागा उपयुक्त ठरणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार