चंद्रकांत पाटील यांनी पालक मंत्र्यांची दाव्याची खिल्ली उडविली.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

विधान परिषद निवडणुकीसाठी आवश्यक मतांचे पाठबळ भाजपकडे असून पालकमंत्री सतेज पाटील यांचा २७० च्या मॅजिक फिगरचा आकडा सांगून दिशाभूल करत आहेत .गरजेल तो पडेल काय, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालक मंत्र्यांची दाव्याची खिल्ली उडविली. पाटील व भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी आज भाजप नेते रामचंद्र डांगे यांच्या घरी भेट घेत नगरसेवकांशी संवाद साधला.

पत्रकारांशी बोलताना पाटील म्णाले, ''जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे फारशी चिंता नाही. काँग्रेस सोबत दोन पक्ष जोडले असले तरी आमच्याकडे आवाडे-कोरे गटाचे पाठबळ आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार २७० मतांची बेरीज करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत. वास्तविक त्यांनी ४१५ आकडा सांगितला पाहिजे होता. सध्या काँग्रेसकडे ३६ व राष्ट्रवादी व शिवसेना जोडल्यामुळे त्यांच्या मतांची बेरीज ११८ होते. भाजपकडे ब्रँडेड १०५ मतदार असून आवाडे व कोरे जोडल्यामुळे भाजपची मतदार संख्या १५१ होते. उर्वरित १४७ मतदानासाठी भाजप व महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहेत. उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज २२ तारखेला भरणार आहे.''

माजी आमदार सुरेश हाळवणकर, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव नाईक निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, रामदास मधाळे, सीताराम भोसले, दयानंद मालवेकर, उदय डांगे, आजम गोलंदाज, अनुप मधाळे, सुजाता डांगे, रवींद्र शहापूरे, पोपट पुजारी, उमेश कर्नाळे, राजेंद्र फल्ले, गौतम एकाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चर्चा समाधानकारक : डांगे

रामचंद्र डांगे यांनी विविध घटकांना सोबत घेत कमळ फुलविले; मात्र थेट नगराध्यक्ष निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागला. चंद्रकांत पाटील यांनी श्री. डांगे यांना ताकद दिली होती. आज भाजपचे नगरसेवक व चंद्रकांत पाटील यांची बंद खोलीत चर्चा झाली. आमचे कांही विषय होते ते मांडले त्यावर समाधानकारक चर्चा झाल्याचे श्री. डांगे यांनी सांगितले.

अशोकराव माने यांच्याशी चर्चा

शिरोळ : येथे जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर, अपक्ष डॉ. अरविंद माने, नगरसेवक श्रीवर्धन माने-देशमुख, इमरान आत्तार, कविता भोसले यांचे दीर संभाजी भोसले यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. जयसिंगपूर नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उमेदवार अमल महाडिक, हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, राजवर्धन नाईक निंबाळकर, नगरसेविका सोनाली मगदूम, बजरंग खामकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post