न गरजणारे ढग बरसलेच नाहीत.

भाजपने तडजोडीतून काय साधले..? हा खरा प्रश्‍न आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :


 कोल्हापूर आमची बेरीज १६५ असून केवळ ४३ मते हवी आहेत.' 'आम्ही गरजणारे नाही तर बरसणारे आहोत,' अशी विधाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत केली; मात्र आज भाजप उमेदवाराने 'व्यापक जनहित' लक्षात घेऊन माघार घेतली.त्यामुळे ते न गरजणारे ढग बरसलेच नाहीत. अर्ज माघार घेऊन भाजपने राज्यात एखादी जागा जास्त मिळवलीही असेल. जिल्ह्यात मात्र पक्षाला नामुष्की पत्करावी लागली हे निश्चित. भाजपने तडजोडीतून काय साधले..? हा खरा प्रश्‍न आहे.

विधानसभेला अमल महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता गेली. या पार्श्वभूमीवर आलेल्या विधान परिषद निवडणुकीत पराभवाचे उट्टे काढण्याची संधी पक्षाला होती. मात्र उमेदवारी मागे घेतल्याने पराभवापेक्षाही जास्त नैराश्य कार्यकर्त्यांमध्ये आले. विजयासाठी आवश्यक असणारी मॅजिक फिगरचा दावा भाजप नेते करत होते. अखेर त्यांची 'झाकली मूठ सव्वालाखाचीच' राहिली. मुळात सतेज पाटील यांचे तगडे आव्हान भाजपसमोर होते. याचे प्रमुख कारण म्हणजे पक्षातील मतदार लोकप्रतिनिंधींमध्ये असणारी नाराजी जास्त होती. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असताना निधी मिळाला नसल्याची खंत भाजपच्या सदस्यांमध्ये होती.

नगरपालिकेतही भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडीच्या तुलनेत अधिक होते; पण ते सदस्य पक्षाच्या बाजूने राहतील का? याची शाश्वती नव्हती. अमल यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक जरी अटीतटीची झाली असली तरी विजयाचा लंबक आघाडीकडेच जात असल्याचे दिसत होते. संघटनात्मक पातळीवर भाजपला आणखी मजबूत करण्याची गरज आहे. या घडीला तरी भाजप हा 'उपरे विरुद्ध ब्रँडेड' याच अंतर्गत संघर्षात अडकलेला दिसतो.

माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याकडे जिल्हा भाजपची सूत्रे आहेत. असे असले तरी प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे जिल्ह्यावर लक्ष असते. आता तरी जिल्ह्याची (महानगरसह) सूत्रे एकाच नेत्याकडे दिली गेली तरच निर्णय प्रक्रिया गतीने होऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा टिकाव लागेल.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार