दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : जिल्ह्यात वन विभागामुळे धनगरवाडे आणि डोंगर वस्त्यांवर विजेचा परवाना मिळत नाही, त्या ठिकाणी १०० टक्के सौरऊर्जेद्वारे विजेची व्यवस्था करून दिली जाईल. शासकीय कार्यालये व इमारतीतील विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी सौर वीज वापरण्यासाठी 'मेढा'ने पुढाकार घेऊन जानेवारीपर्यंत प्रस्ताव द्यावेत, शेती पंपांच्या वीज जोडण्या तोडू नयेत व ट्रॉन्स्फॉर्मर आणि डीपीची रखडलेली कामे १० दिवसांत पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राज्यात १०० नंबर जाऊन ११२ हा नंबर आला आहे. याची कंट्रोलरूम नागपूर आणि नवी मुंबई येथे आहे. यात एखाद्याने ११२ नंबरला फोन केला, तर १० व्या मिनिटाला त्या व्यक्तीला प्रतिसाद मिळाला पाहिजे, असे नियोजन आहे. १० मिनिटांत वाहने आणि गाड्या पोलिसांकडे उपलब्ध असल्या पाहिजेत. यासाठी यावर्षी ४ कोटी ६५ लाख रुपये तरतूद केली आहे. पोलिसांचा शहीदस्तंभ पोलिस मुख्यालयासमोर आहे. त्यासाठी ५० लाख रुपये देत आहे. पोलिस ठाण्यांना १५ लाखांचे अभ्यागत कक्ष केले जाणार आहेत. सिटिझन ३६० म्हणून हा प्रकल्प राबवला जाणार आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार अरुण लाड, चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय तरतूद
२०२०-२१ या वर्षासाठी ४४८ कोटी २१ लाख निधीची तरतूद केली आहे. यापैकी ४४३ कोटी ६४ लाख ७४ हजार निधी खर्च झाला असून, खर्चाचे हे प्रमाण ९८.९८ टक्के आहे. २०२१-२२ साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३७५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ११६ कोटी ६० लाख, ओटीएसपीसाठी १६१ कोटी, अशी अर्थसंकल्पीय तरतूद असून ४५ कोटी १० लाख ४७ हजार निधी यंत्रणांना वितरित केला असून, २४ कोटी ४० लाख १६ हजार खर्च झाला आहे. मंजूर निधी त्या- त्या योजनांवर मार्च अखेर करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.