पंचगंगेच्या पूररेषेची आखणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे कोल्हापूरकरांना महापुराचा फटकादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : ''पंचगंगेच्या पूररेषेची आखणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे कोल्हापूरकरांना महापुराचा फटका बसला आहे.ग्रीन लाईनमध्ये झालेली बांधकामे धोकादायकच आहेत. याबाबत पुन्हा अभ्यास झालाच पाहिजे. तसेच रेड लाईनमध्ये बांधकामाला दिलेल्या परवानगीच्या अटींचा भंग करून 'प्रॉफिट ओव्हर पीपल' हे सूत्र स्वीकारून खालच्या मजल्यांचेही व्यापारीकरण केले आहे. त्यामुळेच कोल्हापूर शहर पुराच्या खाईत लोटले,'' असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. 

मेधा पाटकर म्हणाल्या, ''विज्ञानाचा आधार न घेता बांधकाम व्यावसायिकांनी आखलेली पंचगंगेची पूररेषा तत्कालीन फडणवीस सरकारने मान्य केली. त्याचे परिणाम कोल्हापुरातील जुन्या वस्त्यांनाही भोगावे लागले. गेल्या काही वर्षांत कोल्हापुरात रायगडमधील पुराची पुनरावृत्ती झाली. आलमट्टीची उंचीच नव्हे, तर बॅकवॉटरचा फटकाही कोल्हापूरला महापुरात बसतो. पाण्याची फूग, नदीच्या प्रवाहातील अडथळे या पुरासाठी कारणीभूत आहे. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचणे ही गोष्ट आता जुनी झाली आहे. जुन्या वस्तीत, जेथे यापूर्वी कधीही पुराचे पाणी शिरले नाही, तेथे नागरिकांना पुराच्या पाण्याला तोंड द्यावे लागले. त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. पंचनामे केले जातात; परंतु नुकसानभरपाई दिली जात नाही, तर त्यांना तुटपुंजे अनुदान दिले जाते. याबाबत पालकमंत्र्यांनी पुन्हा विचार करणे गरजेचे आहे.कोल्हापुरात अचानक आठ-दहा फूट पाण्याची पातळी वाढणे म्हणजे कोल्हापुरात चेरापुंजीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस कोल्हापूर, सांगली, सातारा येथे होत आहे, असा मुलांना नव्याने धडा शिकवावा लागेल. नदीच्या प्रवाहाचे सूत्र कधीही बदलू शकत नाही. खरे तर जिल्ह्याच्या विकासासाठी नवी दिशा मांडताना जल, भूमी आणि वृक्ष संवर्धन या तिन्हींचा विचार करून अभ्यास झाला पाहिजे. निसर्गाचे नियम विचारात घ्या. राजकीय हस्तक्षेपामुळे उत्खनन आणि जंगलतोड होत आहे. नदीचा गाळ काढल्यामुळे नदीचा प्रवाह वाढेल, हा नेत्यांनी मांडलेला मुद्दा हास्यास्पद आहे. नदीच्या प्रवाहामुळे काढलेला गाळ काही काळातच भरून निघेल, अशी वस्तुस्थिती आहे. शहरात पुराच्या पाण्याला जमिनीत मुरायला वाव द्या. तोच तुमच्या विकासाचा रस्ता असेल.''

नदीलगत बांधकामास परवानगी दिल्याचा आरोप

पंचगंगा आणि इतर नद्यांच्या पूररेषा करताना नद्यांच्या पाण्याचा प्रवाह प्रमाण मानला जातो. निळी रेषा आखताना ६०७१ क्युमेक्स... आणि रेड लाईन आखताना ८८९४ क्युमेक्स प्रवाह गृहीत धरला जातो; परंतु कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार पूर पातळीलाच पूररेषा संबोधून अहवाल पाठवला. या अहवालानुसार पूररेषा आखावी, असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले. त्यानुसार नवीन पूररेषा मांडताना ६०७१ क्युमेक्स इतक्या प्रवाहाला २०७२ हे प्रमाण ठरवले गेले आणि रेड लाईनसाठी ८८९४ ऐवजी ३४६६ इतके प्रमाण खाली आणले गेले. नदीप्रवाहालगतच्या धनदांडग्यांच्या सुमारे पाचशे हेक्टर जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी दिल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते विजय दिवाण यांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post