विधान परिषद निवडणुकीचा धुरळाउडू लागला..



दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 विधान परिषद निवडणुकीचा धुरळा आता उडू लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.महाविकास आघाडीच्याच नव्हे तर भाजपच्या नगरसेवकांनाही ते भेटत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा अद्याप उमेदवार निवडीतच गुंतली आहे. भाजपकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुटुंबातील उमेदवार निश्चित असला तरी नेमके रिंगणात उतरणार कोण, यावर मात्र अजूनही खलबते सुरू आहेत.

पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात गेल्यावेळी झालेली लढत संपूर्ण राज्यात गाजली होती. सलग तीनवेळा विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाडिक यांना गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी पराभूत केले होते. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, गोकुळ अशा सलग पराभवाने महाडिक विधान परिषद निवडणुकीत उतरतील की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र भाजपच्या गोटातून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचे समजते.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपतर्फे ज्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली, त्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक, राहुल आवाडे, समरजितसिंह घाटगे यांच्या नावाचा समावेश होता. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्कर देण्याची क्षमता या निकषावर भाजपचे महाडिक कुटुंबातील उमेदवारीवर एकमत झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप नेतृत्वाकडे शौमिका महाडिक व अमल महाडिक या दोन नावाशिवाय सध्या अन्य पर्याय दिसत नाही. अमल महाडिक हे देखील भाजपच्या कमळ चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढविली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. त्यामुळे या दोहोंपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर होऊ शकलेली नाही.

दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय यंत्रणा गतिमान केली आहे. त्यांनी या निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासूनच सुरू केली आहे. सहा महिन्यांपासून प्रत्यक्ष भेटीगाठी आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. निवडणुका जाहीर होताच शहरी आणि ग्रामीण भागात काम करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांनीही दौरे सुरू केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post