ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीतच विधान परिषदेचे रणशिंग फुंकले..

श्री. पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील...हसन मुश्रीफ 

भाजपच्या गोटात अजून तरी शांतता....


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : कागलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीतच विधान परिषदेचे रणशिंग फुंकले. श्री. पाटील यांच्या विरोधात कोणी उमेदवारच नाही, असे सांगत श्री.मुश्रीफ यांनी दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत श्री. पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे जाहीरच करून टाकले. दुसरीकडे, भाजपच्या गोटात अजून तरी शांतता असून श्री. पाटील यांच्या विरोधात कोण, याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात आहे.

दरम्यान, या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेचा एकही नगरसेवक मतदार नसणार हे निश्‍चित झाले आहे. महापालिकेचे ८१ नगरसेवक कमी झाले असले तरी नव्या पाच नगरपालिकांतील सदस्य वाढीव मतदार असतील. जिल्ह्यात नव्याने झालेल्या पाच नगरपालिका, नगरपंचायतीतील ८६ नवे मतदार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था गटातील या मतदारसंघाचे श्री. पाटील प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाल जानेवारी २०२२ मध्ये संपत आहे. या निवडणुकीची प्रशासकीय तयारीही सुरू झाली आहे. आठ-दहा दिवसांत प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व १४ नगरपालिकांतील नगरसेवक या निवडणुकीचे मतदार असतील. जुन्या नऊ नगरपालिकांतील विद्यमान नगरसेवकांची मुदत १४ डिसेंबरला संपते; पण १ डिसेंबर या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्याचे आदेश झाल्यास हे नगरसेवक मतदानाला पात्र ठरतील.

सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत श्री. पाटील विरुद्ध तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांच्यात लढत झाली होती. श्री. महाडिक यांनी सलग १८ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी दोन निवडणुकीत श्री. पाटील त्यांच्यासोबत होते तर एका निवडणुकीत श्री. पाटील यांनी प्रा. जयंत पाटील यांच्या बाजूने आपली ताकद लावली होती. सद्यस्थितीत मात्र पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात प्रबळ विरोधक दिसत नाही.

२००७ पासून महाडिक विरुद्ध पाटील असा जिल्ह्यात राजकीय सामना रंगला आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा, विधान परिषद निवडणुकीत या दोघांतील राजकीय युद्ध जिल्ह्याने पाहिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत समेट झाला असे वाटत असतानाच त्याचवर्षी विधानसभेत श्री. पाटील यांचा अमल महाडिक यांनी पराभव केला. तेव्हापासून पुन्हा दोघांतील राजकीय वाद पेटला. आता या निवडणुकी तही श्री. महाडिक यांच्या कुटुंबातील उमेदवार श्री. पाटील यांच्या विरोधात असेल. स्वतः महाडिक उभे राहणार की स्नुषा शौमिका भाजपच्या उमेदवार असणार, हीच उत्सुकता असेल.

Post a Comment

Previous Post Next Post