हेच नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार .
.माजी खासदार धनंजय महाडिक
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूर मधून काँग्रेसने पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाकडून येथून अमल महाडिक निवडणूक लढवत आहेत. यामुळे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मात्र, सतेज पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्र्यांनी निवडूक आयोगाला फसवल्याचा आरोप केलाय.
महाडिक म्हणाले, सतेज पाटलांनी जागेबाबत खोटी माहिती आयोगाकडे सादर केली असून यात दोन लाख 15 हजार 993 स्क्वेअर फूट जागा आहे. त्यात चौथ्या हिस्स्यात असलेली ५३९९८ एवढी जमीन त्यांच्या मालकीची आहे. यात त्यांचे बंधू व दोन पुतण्यांचा देखील वाटा आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या शपथ पत्रात २३६०० स्क्वेअर फूट इतकी जमीन लपवली आहे. याबाबतचा पुरावा देखील आमच्याकडे आहे.
तसेच सयाजी हाॅटेल व डीवायपी माॅल रेंटवर दिल्याचे समजते. मात्र, आम्ही प्रोपर्टी रेंटवर दिली नसल्याचं पाटलांचं म्हणणं आहे. आम्ही पालिकेकडे याबाबत माहिती मागितली होती. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही. त्यांचा १० ते १२ कोटी फाळा बाकी आहे. महापालिकेनं त्यांना १५-२ ची नोटीसही दिली आहे. तसेच त्यांनी कॉसमॉस बँकेकडून ८५ कोटीचं लोन घेतलं आहे. त्यांनी अशा अनेक बाबी आपल्या शपथ पत्रात लपवल्या आहेत.
याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची विनंत जिल्हाधिकाऱ्यांना केली होती व त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचाही पाठपुरावा शासनाकडून होऊ शकला नाही. त्यांच्या उमेवारीबाबत हायकोर्टात अपील करणार आहे. सतेज पाटलांनी त्यांची मालमत्ता, कर्ज लपवले आहे, असा आरोपही महाडिकांनी केला. ते पुढे म्हणाले, अमल महाडिक शंभर टक्के निवडून येणार यात शंका नाही, पण चुकून सतेज पाटील निवडून आले, तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार सतेज पाटील यांनी गेल्या सहा वर्षात सर्वांच्याच कळा काढल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते त्यांच्यावर चिडून आहेत. आता जरी ते त्यांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी हेच नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार आहेत, असा दावा काल महाडिकांनी केला होता.