आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे फटाके फुटणार ..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा ;

 कोल्हापूर :  आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.बहुसदस्यीय रचनेमुळे लगतच्या प्रभागातून कोण निवडणूक लढविणार आहे त्याच्याशी मिळते जुळते घेण्याचे काम इच्छुकांकडून सुरू झाले आहे.

नव्या सभागृहात नगरसेवकांची संख्या ९२ होणार आहे. प्रभागांची संख्या तीस इतकी होई. दोन प्रभाग हे प्रत्येकी चार सदस्यांचे असतील. एक सदस्यीय रचनेत प्रभागाची हद्द मर्यादित होती. सुमारे सहा ते साडेसहा हजार इतकी मतदारसंख्या होती. तीन सदस्यीय रचनेत मतदारसंख्या सुमारे अठरा हजारांच्या घरात असणार आहे. त्यामुळे प्रचारावेळी उंबरा अन्‌ उंबरा ओलांडताना घाम फुटणार आहे. सध्या भौगोलिक संलग्नतेच्या आधारे प्रभागांची रचना सुरू करण्याचे काम सुरू आहे. कोणता प्रभाग आपल्या प्रभागात समावेश होतो याकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान दोन प्रभागात उमेदवाराचा संपर्क असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे लगतच्या प्रभागात जो प्रबळ उमेदवार आहे त्याच्याशी संपर्क वाढविण्याचे काम सध्या सुरू आहे.निवडणुकीच्या आधी किमान पाच महिने तयारीला मिळणार असल्याने आजी माजी नगरसेवक आतापासूनच तयारीला लागले आहे. सद्या ते ज्या भागाचे प्रतिनिधीत्व करतात तो प्रभाग सोडून अन्य प्रभागातील तालीम संस्था, मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू केला आहे.

तिन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन उमेदवार प्रभागात असतील. कॉंग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना तसेच भाजप-ताराराणी आघाडी पाहता किमान बारा उमेदवार एका प्रभागात असतील. अपक्ष उमेदवारांना एकटे लढणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे पॅनेल वेगळे असेल. एक सदस्यीय रचनेत विजयासाठी किमान दोन हजार इतकी मते मिळवावी लागत होती. आता तीन प्रभागात किमान सहा ते सात हजारांच्या मतांची बेजमी करावी लागेल. एकंदरीत सणासुदीच्या दिवसातून इच्छुक मंडळी बाहेर पडणार आहेत. त्यामुळे संपर्क मोहिमेला अधिक गती मिळणार आहे.

मार्च किंवा एप्रिलमध्ये धुरळा

कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. भाजप-ताराराणी आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. जानेवारीपर्यंत मतदारयादीचा कार्यक्रम पूर्ण होईल. मार्चअखेरीस अथवा एप्रिलमध्ये निवडणुकीचा धुरळा उडेल.

Post a Comment

Previous Post Next Post