आयात केलेल्या नेत्यांना भाजप मध्ये अच्छे दिन,दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपमधील उत्तर भारतीय नेत्यांची नाराजी उफाळून आली आहे. अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले राजहंस सिंह यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने भाजपमधील उत्तर भारतीय नेते कमालीचे नाराज झाले आहेत.आता पर्यंतचा इतिहास पाहिला तर आयात केलेल्या नेत्यांना भाजपमध्ये अच्छे दिन, मात्र वर्षानुवर्षे भाजपशी निष्ठा ठेवून काम करणाऱयांच्या पदरात काही पडत नाही असे भाजपचे कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत.

विधान परिषदेसाठी भाजपने दोन दिवसांपूर्वी राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या उमेदवारीमुळे भाजपमधील उत्तर भारतीय नेते अस्वस्थ झाले आहेत. मुंबईतून विधान परिषदेसाठी भाजपमध्ये चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांचा पत्ता कट झाला. राजहंस सिंह यांच्या उमेदवारीमुळे संजय पांडे, संजय उपाध्याय यांच्यासारखे नेतेही नाराज झाल्याचे कार्यकर्ते सांगतात. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जात असेल तर पक्षात आमचे स्थान काय, असा सवाल निष्ठावंत कार्यकर्ते करीत आहेत.

दुसऱया पक्षातून आलेल्यांना उमेदवारी मिळते आणि वर्षानुवर्षे पक्षात राहिलेल्यांवर अन्याय होत असल्याची भाजपमधील कार्यकर्त्यांची भावना बळावत चालली आहे. त्याचा फटका मुंबई महानगरपालिकेसह इतर निवडणुकांमध्ये भाजपला बसणार आहे.

बाहेरच्यांना संधीचा इतिहास

सुमारे 40 वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेले राजहंस सिंह यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करून पाच वर्षेही पूर्ण न केलेले राजहंस सिंह यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले प्रसाद लाड यांनाही थेट विधान परिषदेवर पाठवण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर संधी दिली. काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणे यांना भाजपने आधी राज्यसभेवर पाठवले आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपद दिले. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते केंद्रात मंत्री झाले आहेत. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post