भाजप प्रणीत कोणत्याही कारवाईला सडेतोड तोंड द्यायचे... महाविकास आघाडीचा निर्धार. .


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आता सामना करायचाच, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या राजकीय दबावाला बळी न पडता महाविकास आघाडी म्हणून एकदिलाने उभे राहून भाजप प्रणीत कोणत्याही कारवाईला सडेतोड तोंड द्यायचे, असा निर्धारच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचे समजते.पश्चिम बंगालमध्ये भाजपने ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हैराण केले, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी न डगमगता केंद्रीय तपास यंत्रणांचा धीरोदात्तपणे सामना केलाच शिवाय विधानसभा निवडणुकीत मतदारांचे त्यांना भरघोस समर्थन मिळाले. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला आता घाबरायचे नाही, असा संकल्प महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

याच संकल्पाचा पहिला अध्याय म्हणजे सलग चार महिने सक्तवसुली संचालनालाच्या (ईडी) समोर उपस्थित न राहणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 'ईडी' समोर हजर राहिले. अटकेचा अंदाज असूनही देशमुख हजर झाल्याचे आश्चर्य व्यक्त होते. पण यामागे महाविकास आघाडीचा भाजप विरोधात लढण्याचा हा संकल्प असल्याची चर्चा आहे. 

केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाईला कायदेशीरपणे सामोरे जातानाच ज्या कोणत्या नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी अंगुलीनिर्देश केला तर त्याला सामोरे जायचे, अशी रणनीती आखल्याचे समजते. तसेच भाजपच्या सत्ताकाळातील प्रकरणांचा देखील पर्दाफाश करायचा व राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपचे नेते, त्यांचे निकटवर्तीय यांचे 'पोलखोल' करत जनतेसमोर भाजपच्या कथित प्रामाणिकपणाचा बुरखा फाडणारी प्रकरणे आणायची,असे धोरणही महाविकास आघाडीचे असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post