आता पुन्हा एकदा या करोनाने डोके वर काढले

भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 नवी दिल्ली : जगभरात करोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यातच लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा एकदा या करोनाने डोके वर काढले आहे.करोनाच्या B.1.1.529 या नव्या विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाचे कारण ठरलेल्या या विषाणूने जगातील इतर देशांमध्येही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे.आता भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे.

एम्समधील कम्युनिटी मेडिकल सेंटरचे डॉ. संजय राय यांनी या विषाणूबाबत माहिती देत काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'या विषाणूच्या संसर्ग क्षमतेविषयी पूर्ण माहिती नसली तरी त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे करोना लसीमुळे किंवा नैसर्गिक पद्धतीने शरीरात तयार झालेली करोना विरोधी रोगप्रतिकारक शक्तीलाही हा नवा विषाणू भेदू शकतो.' असे त्यांनी म्हटले आहे.

करोनाच्या नव्या विषाणूने मानवी शरीरातील करोना विरोधी रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदल्यास त्याचा गंभीर धोका तयार होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. दरम्यान, करोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरतो आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता करोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा नवा व्हेरिएंट घातक असल्याचे समोर येत आहे.

डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल १० म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post