सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 सांगली : सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी राजीनामानाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. अखेर मंगळवारी उशिरा या नाट्याला पूर्ण विराम मिळाला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी बदल करण्याचे प्रयत्न गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. मात्र, कोरोना आणि त्यानंतर पदाधिकारी यांनी राजीनामा देण्यास दिलेल्या नकारामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. मात्र, दुसरीकडे पदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी बंड पुकारले. सदस्यांनी पक्षश्रेष्टी आणि कोअर कमिटीकडे नाराजी व्यक्त केली होती. अखेर पदाधिकारी बदलासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी देवेंद्र फडवीस, चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रयत्न केले. त्यावर विद्यमान सदस्यांना एक वर्ष मुदत संपली असल्याने राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे वगळता कोणीही राजीनामा दिलेला नव्हता. पण, पुन्हा नाराज सदस्यांकडून दबाव येऊ लागल्याने अखेर भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सर्व सदस्यांना राजीनामा देण्याबाबत लेखी कळविले. त्यावर मंगळवारी प्राजक्त नंदकुमार कोरे यांनी पक्षादेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला.

भारतीय जनता पार्टीने मला जिल्ह्याची नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पार्टीची आभारी आहे. पक्षाच्या सर्व नेत्यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली. ती प्रामाणिकपणे गेल्या दोन वर्षात पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. या काळामध्ये कोरोना महापूर अशी परिस्थिती असतानाही या परिस्थितीत चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. पार्टीचे नेते जी जबाबदारी देतील ती पार पडण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.

    - प्राजक्ता कोरे

Post a Comment

Previous Post Next Post