जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच स्वतंत्र पॅनेल करून लढत आहे.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 सांगली : तीन जागा बिनविरोध जिंकत सामना एकतर्फी करण्याच्या इराद्याने रिंगणात उतरलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सहकार विकास आघाडीसमोर तीन गटात भाजप पुरस्कृत विरोधी शेतकरी विकास पॅनेलने तगडे आव्हान उभे केले आहे.या गटात 'क्रॉस वोटिंग'ची धोका ओळखून आघाडीच्या नेत्यांनी दुरुस्तीची कसरत सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपही अंतर्गत कलहाने बेजार असून ते वाद मिटवून जमवत आणलेल्या गणितावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी धडपड सुरु आहे. मोजके मतदार असल्याने काटा कोणत्याही क्षणी फिरु शकतो. येत्या रविवारी मतदान असून त्या आधीचे दोन दिवसात 'गेम' करण्यासाठी काट्याच्या लढती मधील इच्छुकांनी कंबर कसली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच स्वतंत्र पॅनेल करून लढत आहे.

बँक, पतसंस्था गट; जत सोसायटी गट आणि मजूर संस्था गटात भाजपचे प्रथमच तगडे आव्हान आहे. अर्थात या पॅनेलचा सध्या चेहरा भाजपचा असला तरी त्यातले सर्वच चेहरे जिल्हा बँकेच्या मैदानातील कसलेले मल्ल आहेत. त्यांचे मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांत, जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थात, गटात त्यांचा पूर्वीपासूनचा व्यक्तीगत संबंध आहे. त्यांनी सभा, बैठकांपेक्षा व्यक्तीगत पातळीवर भेट आणि मतदान सेट, असा सरळ फॉर्म्युला वापरला आहे. तो किती प्रभावी ठरतो, हे मतमोजणीत कळेल, मात्र त्यामुळे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलमध्ये 'हलक्यात घेऊ नका'चा सूर उमटू लागला आहे.

पतसंस्था-बँका गटात भलतीच चुरस निर्माण झाली असून सगळी काठावरचीच कसरत दिसते आहे. या गटात भाजप सावध असून जमवत आणलेले गणित पक्षांतर्गत कलहामुळे विस्कटू नये, याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. यात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किरण लाड विरुध्द भाजप आघाडीचे राहुल महाडीक, अजित चव्हाण अशी लढत असले. इथे क्रॉस वोटींगचा मोठा धोका असून मतदार जिल्हाभरात विखुरले असल्याने त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी सर्व ते उपाय करावे लागणार आहेत.

मजूर सोसायटी गटातील लढती रंगतदार अवस्थेत आहेत. या गटावर राजकीय प्रभावापेक्षा विविध पक्षीय नेत्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे पॅनेलपेक्षा उमेदवार किती जवळचे यावर गणित ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे संग्रामसिंह देशमुख-सत्यजीत देशमुख विरुध्द आघाडीचे सुनील ताटे, हनुमंत देशमुख अशी ही लढत आहे. इथेही जिल्हाभरातील मतदार आहेत. सर्वच मतदार कसलेले असल्याने त्यांना वश करणे महागात पडणारे आहे.

आघाडीच्या पुढील वाटचालीचा निकाल...

जतमध्ये उमेदवार ठरवता नेमके काय घडले आणि निकालात काय घडणार, हा जिल्ह्याच्या औत्सुक्याचा विषय आहे. तेथे राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असून गडबड झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या 'इमेज'वर परिणाम होईल, असा एका संदेश पेरला गेला आहे. तो उगवतो का, हे महत्वाचे ठरेल. आमदार विक्रमसिंह सावंत विरुध्द राष्ट्रवादीचे बंडखोर प्रकाश जमदाडे या लढतीचा निकाल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पुढच्या वाटचालीचाही निकाल ठरवणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post