राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
सांगली - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत बँक-पतसंस्था गटात भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलच्या राहूल महाडिक यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते किरण लाड यांचा पराभव करत बँकेत एंट्री केली आहे.या गटातून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना विजय मिळवला आहे. या गटाबद्दल जिल्हाभर उत्सुकता होती.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीची सहकार विकास पॅनेलने १२ जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे. पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली या पॅनेलने मोठे यश मिळवले आहे. बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पॅनेल लावून लढत असलेल्या भाजपने आतापर्यंत दोन जागांवर विजय मिळवत चांगली कामगिरी नोंदवली आहे. महाडिक यांचा बँक, पतसंस्था गटातील विजय जवळपास निश्चित मानला जात होता. ते नेमका कुणाला धक्का देणार, याबाबत चर्चा होती. पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारत जिल्हा बँकेत प्रवेश केला.
दुसरीकडे महिला गटातील काँग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या अनिता सगरे यांनी मोठा विजय मिळवला आहे. आरक्षित गटातील बाळासाहेब होनमोरे, मन्सूर खतीब यांनी बाजी मारली आहे. सहकार विकास पॅनेलने आतापर्यंत १२ जागा जिंकल्या असून सत्तेच्या चाव्या हाती आल्या आहेत. याआधी या पॅनेलचे तीन लोक बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत या पॅनेलकडे १५ जागा आल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात मजूर सोसायची गटाची मतमोजणी सुरु असून त्यात कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.