कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

 हुपरीत तिरडी मोर्चा काढण्यात आला..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी :  आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यातील कानडी गावगुंडांनी केलेल्या विटंबना आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याने काढलेल्या अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ बुधवारी साताऱ्यातील रहिमतपूर, कोल्हापुरातील हुपरी आणि सांगलीतील मिरजेत शिवसेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.हुपरीत तिरडी मोर्चा काढण्यात आला. तर, मिरज आणि रहिमतपूरमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.


शिवसेना कोल्हापूर जिल्हा व हुपरी शहर यांच्या वतीने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पदाधिकारी, सखल मराठा समाजाचे पदाधिकारी, शिवप्रतिष्ठान, शिवप्रेमी नागरिक, शिवसैनिक शहरातील शिवाजीनगर भागामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. तेथून बसस्थानकापर्यंत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सात्ताप्पा भवान, विभागप्रमुख विनायक विभुते, शहरप्रमुख अमोल देशपांडे, तालुका युवा अधिकारी संताजी देसाई, शहर अधिकारी भरत देसाई, महिला आघाडीच्या तालुका संघटक उषा चौगुले, शहर संघटक मीना जाधव, रेहाना नाईकवडे, शिवप्रतिष्ठानचे अजित सुतार, शिवसेना पक्षप्रतोद बाळासाहेब मुधाळे, नगरसेविका पूनम पाटील, राजेंद्र पाटील, अर्जुन जाधव, अरुण गायकवाड आदी सहभागी झाले होते.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील झेंडा चौकात बुधवारी सकाळी शिवप्रेमींनी एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली. मुघलांच्या राज्याचा अंत करत स्वराज्याची स्थापना केली, देशामध्ये खऱ्या अर्थाने समतेचा विचार रुजवला. संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या शिवरायांच्या पुतळय़ाची विटंबना अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे, अशा संतप्त भावना याप्रसंगी शिवप्रेमींनी व्यक्त केल्या. बोम्मई यांचे या घटनेला समर्थन आहे का? असा सवाल करत, केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींकर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमींनी यावेळी केली.

सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक भाजप सरकारचा जोरदार शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभूराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी वाहतूक थांबवली होती. यावेळी शिवसेनेचे सांगली उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुजाता इंगळे, मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह रजपूत, विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, गजानन मोरे, बाळासाहेब मगदूम, सतीश नलवडे, बाळासाहेब मगदूम, प्रदीप जाधव, बबन कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत मैगुरे आणि सहकारी कार्यकर्त्यांनी मंगळवारी मिरजेत शिवसैनिकांनी कर्नाटकाच्या ध्वजाची होळी करून निषेध केला.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार