कागल परिसरात तीन गव्यांचा कळप असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले

 

दैनिक हुपरी समाचार : 

कागल परिसरात तीन गव्यांचा कळप असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले; तर पेठवडगावात कालपर्यंत असलेला गवा भादोलेमार्गे शिगावकडे दुपारी मार्गस्थ झाला तर सायंकाळी आणखी एक गवा मंगरायाचीवाडी हद्दीत दिसल्याने खळबळ उडाली आहे.कागल येथील तीन गवे लक्ष्मी टेकडीच्या झाडीतून परिसरात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पन्हाळा तालुक्यातील हरपवडे येथे चिखलात रुतून बसलेल्या जखमी गव्याला बाहेर काढण्यात यश आले असले तरी चार दिवसांपासून त्याची शुश्रूषा करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत.

कागलच्या जैवविविधता उद्यान तसेच परिसरामध्ये मंगळवारी तीन गव्यांचे नागरिकांना दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गव्यांकडून ऊस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. लक्ष्मी टेकडीवरील दाट झाडीतून गव्यांनी कागल परिसरात प्रवेश केल्याची चर्चा आहे.

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा परिसर रस्त्यालगत असलेल्या गर्द झाडीमध्ये तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या जैव विविधता उद्यानामध्ये निर्माण झालेल्या झाडांमध्ये गवे विश्रांती घेत असल्याचे नागरिकांना आढळून आले. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना मंगळवारी गव्यांचे दर्शन झाले. जैवविविधता उद्यानामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही दाट झाडांच्या आडोशाने विश्रांती घेत असलेले गवे आढळून आले.

जैवविविधता उद्यानामध्ये प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी व देखभालीसाठी पुरेसा निधी नसल्यामुळे खूप झाडे वाढली आहेत. उद्यान निर्माण करताना काही जंगली प्राण्यांची चित्रे येथे रंगवण्यात आली होती, मात्र उद्यानामध्ये खुद्द गवे येऊन विश्रांती घेत असल्यामुळे चित्रातील प्राणी प्रत्यक्षात अवतरल्याचे अनुभवास येत आहे.

शिगावच्या दिशेने मार्गस्थ

पेठवडगाव : गेले दोन दिवस पेठवडगाव येथे वास्तवास असलेला 'तो' गवा वारणा नदीच्या काठाने शिगाव (ता. वाळवा) च्या दिशेने गेल्याने अखेर वडगाववासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, वारणा नदी काठावरील भादोले, लाटवडे ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोल्हापूर येथील बोंद्रेनगर व्हाया भुयेवाडी ते पेठवडगाव असा थरारक प्रवास करीत असलेल्या त्या गव्याच्या दहशतीने नागरिकांत घबराट पसरली होती. शनिवारी भुयेवाडी येथील एका तरुणाचा नाहक बळी घेऊन गायब झालेल्या गव्याने प्रशासनाची झोप उडविली होती. 'गेला गवा कुणीकडे' म्हणण्याची वेळ आलेल्या नागरिकांना रविवारी पहाटे पेठवडगाव येथील यादव कॉलनीतील नागरिकांना गव्याने दर्शन दिल्याने घबराट पसरली. नागोबावाडी परिसरात दिवसभर वास्तव्य करून गवा रात्री गायब झाला. परिणामी शोधार्थ आलेल्या वन विभागाच्या पथकाला हात हलवत परत जावे लागले होते.

दरम्यान, सोमवारी पहाटे भादोले येथील चांदोली क्रमांक 1 या वसाहतीच्या पाठीमागील शेतात पिकाला पाणी पाजत असलेल्या शेतकर्‍याला गव्याचे दर्शन झाले. तसेच शिगाव पाणंद तेलकीत विसावा घेतल्याचे गव्याला पाहिल्याचे वन विभागाला कळविले. त्यामुळे वन अधिकारी दिलीप खंदारे, दिलीप गूळमुदे हे रेस्क्यू टीमच्या सदस्यांना घेऊन भादोले परिसरात दाखल झाले. दरम्यान, गव्याने नदीकाठच्या शेतातून लाटवडे हद्दीतून शिगाव येथील नदीच्या पुलाकडे मार्गक्रमण केली असल्याची माहिती सायंकाळी वन अधिकारी खंदारे यांनी दिली. दरम्यान, गव्याने कोणतीही जीवितहानी केली नसून तो शांतपणे अधिवासात मार्गस्थ होत आहे. नागरिकांनी विनाकारण त्याच्या मार्गात अडथळे होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन खंदारे व गुळमुदे यांनी केले आहे.

आणि दुसरा आला…!

एका गव्याच्या स्थलांतराच्या बातमीने सुटकेचा नि:श्वास सोडण्यापूर्वी दुसरा गवा दाखल झाल्याने पुन्हा वडगाववासीयांना हबकी बसली आहे. मंगरायाचीवाडी फाट्याजवळ असलेल्या मयूर दूध संघालगतच्या रस्त्यावरील एका विजेच्या खांबाखाली गवा उभा राहिलेला खोत-पाटील कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री पहिला. दरम्यान, गवा आल्याची माहिती त्यांनी मंगरायाचीवाडी ग्रामस्थांना दिली. गावकर्‍यांनी प्रकाशझोत पाडून, आरडाओरडा करून गव्याला देवगिरी फार्म हाऊसकडे हुसकावून लावले. दरम्यान, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या सुरक्षा रक्षकांनी गवा उसाच्या पिकात गेल्याचे सांगितले. वन विभागाला पाचारण करण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गव्याची शोध मोहीम सुरू होती.

चिखलात रुतलेला गवा सुखरूप

कळे : धामणी खोर्‍यातील हरपवडे (ता. पन्हाळा) येथे चिखलात रुतून बसलेल्या गव्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढून चारा-पाण्याची व्यवस्था करून वैद्यकीय उपचार केले. दरम्यान, गव्याला अजूनही हलता येत नसल्याने वन विभागाचे कर्मचारी त्याची देखरेख करत आहेत.

पावसाळ्यात हरपवडे, आंबर्डे येथे मोठ्या प्रमाणात डोंगर खचून माती व गाळ हरपवडे गावच्या हद्दीतील 'गुरवाचा नाळवा' परिसरातील ओढ्याद्वारे शेत शिवारात पसरला आहे. चार दिवसांपासून कळपातून चुकलेला गवा चिखलात रुतून बसल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने गव्याला चिखलाबाहेर काढले. बचाव पथकामध्ये वनपाल नाथा पाटील, वनरक्षक बाजीराव देसाई, एस. व्ही. देसाई, वनमजूर विश्वास शिंदे, रघुनाथ पाटील, निवृत्ती चौधरी सहभागी झाले होते. पुढच्या पायांना दुखापत व अशक्तपणामुळे गव्याला जागेवरून हलता येत नव्हते. पडळ पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज कांबळे यांनी सलाईन व इंजेक्शनद्वारे त्याच्या वैद्यकीय उपचार केले. गेल्या चार दिवसांपासून वनविभाग गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

नानीबाई चिखलीत सहा तास ठिय्या

नानीबाई चिखली : नानीबाई चिखली (ता. कागल) येथील तेली पाणंद परिसरात असणार्‍या प्रवीण चाबुकस्वार यांच्या केळीच्या बागेत मंगळवारी दुपारी अडीच वाजता गव्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान रात्रीच्या सुमारास गवा पुन्हा माघारी फिरला.

ग्रामपंचायतीने वनविभागास कळल्यानंतर वनपाल बी. एन. शिंदे व त्यांचे पथक तासाभरात घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दी झाली होती. पण वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी भुयेवाडीतील हल्ल्याचा अनुभव लक्षात घेत ग्रामस्थांना लांबच ठेवले. दुपारी अडीचपासून रात्री साडेआठपर्यंत गवा एकाच ठिकाणी ऊठबस करत होता. रात्री साडेआठला नानीबाई चिखलीच्या पश्चिमेकडे असणार्‍या उसामध्ये तो निघून गेला. कापशी, बेनिक्रे किंवा वाघजाई या त्याच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणी तो जाण्याची शक्यता असल्याचे वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. परिसरातील नागरिकाना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.तसेच नानीबाई चिखली ग्रामपंचायतीने सावधानता बाळगण्याची दवंडी गावातून दिली.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार