कोल्हापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याचे दर्शन

नागरिकांच्या मनात धास्ती..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्याचे दर्शन होत असल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. आज पहाटे लक्षतीर्थ वसाहत परिसरासह शहरातील पंचगंगा नदी घाटालगत शेतात आणखी एक गवा आढळून आला.वाट चुकून नागरी वस्तीत आलेल्या या गव्यांना पुन्हा त्यांच्या कळपात पाठविण्यासाठी वन विभाग, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी दिवसभर प्रयत्नशील होते. दरम्यान, गव्याला पाहण्यासाठी तसेच हुसकावून लावण्यासाठी जमलेल्या हुल्लडबाजांमुळे गवा बिथरला होता. त्यामुळे या कामात अडथळे निर्माण होत होते.

कोल्हापूर शहराच्या उपनगरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील नागरी वस्तीत शुक्रवारी रात्री आलेल्या गवा रेडय़ाला कुत्र्यांनी घेरले होते. त्यामुळे तो बिथरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचवेळी परिसरातील काही तरुणांनी समयसूचकता दाखवून कुत्र्यांच्या तावडीतून गव्याला हुसकवण्यात यश मिळवले. पाठोपाठ पहाटे पंचगंगा घाट परिसरात गायकवाड वाडा ते जामदार क्लबसमोरील शेतात आणखी एक गवा लोकांच्या नजरेस पडला. गवा आल्याचे कळताच सकाळी लोकांनी गर्दी केली. या परिसरातून गव्याला हुसकावण्याचा प्रयत्नही झाला. नदीकाठ परिसरातील महादेव मंदिर येथे काही वेळ गवा थांबला होता. पंचगंगा तालीम ते शिवाजी पुलाकडे जाणाऱया रस्त्यावरून गवा दिसून येत होता. राबाडे यांच्या मळ्यात गवा असताना या मार्गावरील वाहतूक काही वेळ सुरू होती.

दरम्यान, गव्याला पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचे निदर्शनास येताच, पोलिसांनी या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. काही अतिउत्साही लोकांनी गव्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गवा बिथरण्याची शक्यता पाहाता पोलीस व महापालिकेच्या कर्मचाऱयांनी लोकांनाच हटकले. नदीकाठ परिसरातच गव्याने ठाण मांडल्याने वन विभागाकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे प्रयत्न सुरू होते.

Post a Comment

Previous Post Next Post