कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी रथ सुसाट
कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा विजयी रथ सुसाट आहे. विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आता त्यांची कोल्हापूर जिल्हा बँकेवरही बिन विरोध निवड झाली आहे.गगनबावडा विकास सेवा संस्था गटातून सतेज पाटील यांची बाजी मारली आहे. या गटातून सतेज पाटील यांच्यासोबत दोन जणांनी डमी अर्ज भरले होते, मात्र त्यांची अर्ज मागे घेण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. जिल्हा बँकेसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत होती.
जिल्हा बँकेच्या राजकारणात सध्या प्रचंड चुरस सुरु आहे. अनेक संचालकांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. ठरावधारक आपल्या बाजुने वळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. गगनबावडा संस्था गटात ६६ ठरावधारक असून, सतेज पाटील यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत ४६ ठरावधारक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होईल असे म्हटले जात होते. त्यानुसार त्यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली.
गगनबावडा तालुका संस्था गटात याआधी पी. जी. शिंदे यांचे प्राबल्य होते. मात्र, शिंदे यांनी यावेळी अर्ज दाखल केला नाही. गगनबावडा संस्था गटातून काल खोपडेवाडीच्या महादेव केशव पडवळ आणि पळसंबेच्या दीपक पांडुरंग लाड यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र हे दोन्ही ठरावधारक सतेज पाटील यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे या दोघांनीही अर्ज मागे घेण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.
Comments
Post a Comment