पंचगंगा नदीत मृत माशांचा खच ..

मासे नेमके कशामुळे मरतात..? त्यांचा मृत्यू नैसर्गिक असतो, की मानव निर्मित कारणांमुळे त्यांचा मृत्यू होतो ? हे समोर आले नाही.


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 कोल्हापूर : पंचगंगा नदीत दरवर्षी मासे मरतात.सर्वसाधारण  पणे ज्या ठिकाणी बंधारा आहे, तेथे मृत माशांचा खच पाहायला मिळतो. हे मासे नेमके कशामुळे मरतात..? त्यांचा मृत्यू नैसर्गिक असतो, की मानव निर्मित कारणांमुळे त्यांचा मृत्यू होतो ? हे समोर आले नाही. अशी घटना घडल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेण्याचे सोपस्कार पार पडतात, पण त्यांच्या जवळही माशांच्या मृत्यूचे नेमके कारण नाही.

अवकाळी पाऊस, औद्योगिक सांडपाणी आणि पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होणे, अशी कारणे सांगितली जातात. मासे मोठ्या प्रमाणात मृत होणे, ही नदीच्या नैसर्गिक पर्यावरणीय व्यवस्थेच्या (इकॉलॉजी) दृष्टीने धोक्याचा इशारा देत आहेत.पंचगंगा नदीत तेरवाड आणि शिरोळ या ठिकाणी दरवर्षी दोन ते तीन वेळा मासे मृत होण्याची घटना घडते. यंदा वारणा नदीतही नुकतीच मासे मेल्याची घटना शिगाव-भादोली बंधाऱ्याजवळ घडली. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नेमके मासे मरण्याचे कारण नाही. त्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात.?, हे निश्चित नाही.

 तेरवाड आणि शिरोळ बंधाऱ्याजवळ जे नाले नदीत मिसळतात, त्यातून घरगुती सांडपाण्यासोबतच औद्योगिक सांडपाणीही मिसळते. वळवाचा पाऊस पडला किंवा अवकाळी पाऊस पडला, की नाल्यात साठलेले पाणी नदीत जाते. या रासायनिक पाण्यामुळे मासे मृत होण्याच्या घटना घडतात, असे तज्ज्ञ सांगतात. पण याला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुजोरा मिळत नाही. मंडळाकडून पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यातील घटकांचे प्रमाण तपासले जाते. पण मासे मरण्याच्या नेमक्या निष्कर्षापर्यंत ते पोहचू शकलेले नाहीत.

आकडे सांगतात

  • पंचगंगा नदीची लांबी ३३८ किलोमीटर

  • नदीवरील बंधारे ६४

  • नदीत मिसळणारे नाले ६४

  • नदीची पर्यावरण व्यवस्था महत्त्वाची

नदीची नैसर्गिक पर्यावरणीय व्यवस्था असते. (इको सिस्टीम) त्यात वनस्पती, जलचर यांचा समावेश असतो. नदी प्रदूषणामुळे ही व्यवस्था धोक्यात आली आहे. पंचगंगा नदीत कटला, रोहू, टिलाप, मांगूर, मिरगल, कानस, वंजी, मरळ, पाणगा, शिवडा, शेंगाळ, खडस, पोटीळ, वाम, कोळशी, ग्रासकार्ड, शिप्रन, खवली हे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रजातींचे संवर्धन आवश्यक आहे.

पंचगंगा नदीत या वर्षी मासे मृत होण्याची घटना घडली. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र मासे मरण्याचे कारण नैसर्गिक आहे, की मानवनिर्मित या निष्कर्षापर्यंत येता आलेले नाही.

- प्रमोद माने, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चेअरमननी सूचना देऊनही प्रादेशिक कार्यालयातून या घटनेचा अभ्यास केला गेला नाही. औद्योगिक सांडपाण्यामुळे नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडतात. हवामानातील बदल हे कारण जरी असले तरी ज्या ठिकाणी नदीच्या पाण्यामधील प्रदूषणाची तीव्रता अधिक असते तेथेच मासे मृत झाल्याचे दिसते.

- उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार