सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ पर्याय देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोडण्या सुरू केल्या

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात प्रबळ पर्याय देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोडण्या सुरू केल्या असून त्यात आमदार प्रकाश आबिटकर,  माजी आमदार चंद्रदीप नरके, संपतबापू पवार-पाटील यांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.काल (ता. ११) आमदार पाटील व संपतबापू यांच्यात यासंदर्भात बैठकही झाली. दरम्यान, या पर्यायासोबत आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही यावे यासाठी आमदार पाटील प्रयत्नशील आहेत.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युलाच बँकेत वापरला जाणार असे जाहीर केले; पण यात शिवसेनेला आता असलेल्या दोन जागा व्यतिरिक्त जादा जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आबिटकर यांनाच हे मान्य नसल्याने त्यांच्याकडून पर्यायांची चाचपणी सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वीच यावर प्राथमिक चर्चा झाली होती; पण त्यावेळी आता उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेल्या आबिटकर यांच्यासह संपतबापू व श्री. नरके यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले; पण कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आल्यानंतर या घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. त्यातूनच आज चंद्रकांत पाटील-संपत बापू यांच्यात खलबते झाली.

निवडणुकीत विकास संस्था गटातील बारा जागा सोडून उर्वरित नऊ जागांपैकी जास्तीत जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

निवडणुकीत विकास संस्था गटातील बारा जागा सोडून उर्वरित नऊ जागांपैकी जास्तीत जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचा सुरू आहे. त्यासाठी कोरे, आवाडे व महाडिक यांनाही सोबत घेण्याची तयारी चर्चेच्या माध्यमातून सुरू होती. तोपर्यंत जागा वाटपावरून शिवसेनेचे श्री. आबिटकर व नरके हेच यातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी असेल तर जिल्हा बँकेत शिवसेनेला समान वाटा हवा अशी या दोघांची भूमिका असल्याचे समजते. आबिटकर स्वतःच्या भावासाठी तर नरके, पवार-पाटील कार्यकर्त्यासाठी आग्रही आहेत. याबाबत पवार-पाटील यांनी आबिटकर यांच्याशी प्राथमिक चर्चाही केल्याचे समजते; पण शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेतृत्त्वाकडून काही आदेश आले तर नरके-आबिटकर भूमिकेवर ठाम राहतील का ? याविषयी भाजपचे चंद्रकांत पाटील साशंक आहेत.

कोरे यांनीही सत्ताधाऱ्यांकडे अजून दोन तर श्री. आवाडे यांनी किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. सद्या कोरे यांच्यासह त्यांचे दोन संचालक आहे तर आवाडे यांचे एक संचालक आहेत. शिवसेनेला सोबत घ्यायचे झाल्यास या दोघांना वाढीव जागा देणे सत्ताधाऱ्यांना शक्य नाही. याच मुद्यावर आवाडे-कोरे-महाडिक यांनाच भाजपसोबत घेण्याच्या हालचाली चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर सुरू आहेत; पण सत्ताधाऱ्यांसोबतच्या चर्चेत हे तिघेही पुढे गेल्याने ते पुन्हा माघारी जातील का ? हा प्रश्‍न आहे.

Post a Comment

Previous Post Next Post